
>> अमृत तारो
नावच तिचे सुखना! काठाकाठाने बहरलेली हिरवीगार शेते, मालदार शेतकरी… असे आजवरचे निसर्गसंपन्न चित्र! परंतु यंदाच्या भयंकर दुष्काळाने हे चित्रच विस्कटून टाकले आहे. गेल्या वर्षी ओसंडून वाहणारी सुखना यंदा पावसाच्या एका थेंबाला तरसली! पाऊस रुसल्याने नदीपात्राचे वैराण वाळवंट झाले असून, महाकाय भेगांनी पात्राचे सौंदर्य पार विद्रूप केले आहे. उघडीबोडकी पडलेली जमीन, त्यावर आशेने फिरणारे पक्ष्यांचे निस्तेज थवे पाहून कोणाच्याही काळजात कालवाकालव व्हावी!
छत्रपती संभाजीनगराला वेढून असलेल्या डोंगररांगातून सुखना नदीचा उगम. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हयांतून प्रवास करत पुढे सुखना गोदावरीला जाऊन मिळते. नदीचा प्रवास छोटासा असला तरी तिने आणलेले ऐश्वर्य अमाप आहे. सुखना नदीने आपला काठ समृद्ध केला आहे. त्यातही वाकुळणीच्या पंचक्रोशीत पिण्याचे पाणी, सिंचन, जनावरांची तहान भागवण्याची जबाबदारी सुखना लीलया पेलली आहे. पण यंदा मराठवाड्यावर पाऊसच रुसला.
जुलैनंतर मराठवाड्यात पावसाचा थेंबही पडला नाही. आभाळाकडे डोळे लावून शेतकरी थकला, पण पावसाला कणव आली नाही.
दोन्ही हंगाम गेले, आता काय करायचे?
पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, आता रब्बी हंगामातील पेरण्यांबाबतही शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. जमिनीत पुरेशी ओल नसल्याने पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतीचे नुकसान, जनावरांसाठी चारा आणि आहे. पाण्याची टंचाई, तसेच वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पिके वाचवण्यासाठी पाण्याची सोय करावी, तर दुसरीकडे पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या २० वर्षांत अशी परिस्थिती पाहिली नाही’
‘सुखना नदीच्या कोरड्या पात्राकडे पाहताना स्थानिक शेतकऱ्यांच्या मनात भविष्यातील संकटाची चिंता वाढत आहे. एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले, ‘गेल्या २० वर्षांत सुखना नदी अशी कोरडी पडलेली आम्ही पाहिली नाही. यंदा नदीत पाणीच नाही. विहिरी आटल्या, शेतीचे नुकसान झाले आणि आता जनावरांना पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न पडला आहे. आम्ही जगायचे कसे?’ शेतकऱ्यांच्या या प्रश्नातून परिसरातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता स्पष्ट होत आहे. पावसाअभावी शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला
संपूर्ण परिसंस्थाच धोक्यात!
सलग तीन महिने पावसाळा कोरडाठाक गेल्यामुळे सुखना नदी सुकली. नदीपात्राला मोठमोठ्या भेगा पडल्या. नदीच कोरडी पडल्याने तिच्यावर अवलंबून असलेली संपूर्ण परिसंस्थाच धोक्यात आली. नदीच्या काठाकाठाने असलेल्या विहिरी, बोअरवेल आटल्या आहेत. नदीपात्राचे झालेले वाळवंट दुष्काळाची भयावहता अधिकच गडद करत आहे. विशेष म्हणजे पात्रात काटेरी झुडपांची वाढ झपाट्याने झाली आहे. यामुळे नदीच्या अस्तित्वावरच संकट आले आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
सुखना नदी कोरडी पडल्याने गावांतील पाणीपुरवठ्यावरही संकट ओढवले आहे. नळयोजना प्रभावित होण्याची भीती असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांना दूरवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


























































