
महागाईला आग लागली आहे. आजचा भाव उद्या बदलतो. कोणतीही जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही. महागाईने कंबरडे मोडले असतानाच फडणवीस सरकारने दुष्काळी मदतीचे डफडे वाजवले आहे! दिवाळीसाठी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात येणार आहे. बाजारात किराणा मालाचे भाव पाहिले तर देवाभाऊंचे डोळे पांढरे होतील! फटाके तर दूरच राहिले, पाच हजारांत किराणा भरायचा की, कपडे घ्यायचे? सांगा देवाभाऊ, तुमच्या पाच हजारांत दिवाळी कशी करायची, असा सवाल करण्यात येत आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला. त्याचबरोबर दिवाळीच्या तोंडावर मदत म्हणून पाच हजार रुपये अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दोन हजार रुपये भाऊबीज देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी माध्यमांसमोर येऊन शेतकऱ्यांची दिवाळी कशी आनंदात साजरी होईल हे सांगितले. सध्याचा महागाईचा चढा आलेख पाहता एका कुटुंबाची तरी दिवाळी पाच हजारांत साजरी होईल का, असा प्रश्न आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. हातातोंडाची मिळवणी करताना सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.
निदान बाजारात फेरफटका तरी मारायचा
पावसाने ओढ दिल्यापासून बाजारातही महागाईचा भयंकर वणवा पेटला आहे. रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, औषधी, भाज्या, फळे आवाक्याबाहेर गेले आहेत. तेल, तूप खरेदी करण्यापेक्षा तडक फोडणी बरी, असा विचार गोरगरीब करत आहेत. करडी तेल ३०० रुपये लिटर तर सोयाबीन १६० रुपये लिटर मिळत आहे. कोणतीही भाजी घ्या, २० ते २५ रुपये पावशेर मिळते. भाज्या नकोत, कांदा-भाकर बरी असा विचार करण्याचीही सोय राहिली नाही. पाच हजार रुपये मदत जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळाने निदान बाजारात फेरफटका तरी मारायचा, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
देवाभाऊ, जरा हे भाव बघा (प्रतिकिलो)
गहू – ४० ते ४५ रुपये
ज्वारी ५५ ते ६० रुपये
तांदूळ – ८५ ते ९५ रुपये
तूर डाळ – १६० रुपये
हरभरा डाळ- १०० रुपये
मूग डाळ १२० रुपये
बाजरी ३८ रुपये
गूळ ७५ रुपये
साखर – ६० रुपये
चहा पावडर – ५०० रुपये
शेंगदाणे – १५० रुपये
साबुदाणा – ९० रुपये
भगर – २६० रुपये
सोयाबीन तेल- १६०-१६५ रुपये
करडी तेल – २६०-२६५ रुपये
शेंगदाणा तेल – २३५-२४० रुपये
सूर्यफूल तेल – १८५-१९० रुपये
पोहे – ६५-७० रुपये
भडंग मुरमुरे – १९० रुपये
कांदा – ६० रुपये किलो
बटाटा – ३० – ४० रुपये किलो
वांगे – २५ रुपये पाव
पालक – १५ रुपये जुडी
मेथी – २० रुपये जुडी
चुका – २० रुपये जुडी
कोथिंबीर – १५ रुपये जुडी
दोडका २० ते २५ रुपये पाव
चवळी – २० ते २५ रुपये पाव
काकडी – २५ ते ३० रुपये पाव
गिलके ३० रुपये पाव
फ्लॉवर २५ रुपये पाव
पत्ताकोबी – २५ रुपये पाव
टोमॅटो – ३० ते ४० रुपये किलो


























































