एका रेपिस्ट पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी राज्यपाल केलं, अंकिता भंडारी प्रकरणावरून संजय राऊत यांची मोदी-शहांवर घणाघाती टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास तिच्या आई-वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरून राजकारण तापलेले असून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. अंकिता भंडारी हिची 2022 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात भाजप नेते दुष्यंत गौतम यांचे नाव समोर आले होते. मात्र चौकशी सुरू असतानाच त्यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

अंकिता भंडारी हिची 2022 मध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. एका रिसॉर्टवर तिचा खून झाला आणि त्या खुनामध्ये भाजपचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांचे नाव आले. दुष्यंत गौतम यांची चौकशी सुरू आहे आणि ते मुख्य आरोपी असावेत असे लोकांचे म्हणणे आहे. ही चौकशी सुरू असताना दुष्यंत गौतम यांची सिक्कीममध्ये राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल म्हणून त्यांना जे संरक्षण मिळले. त्यामुळे त्यांची चौकशी बंद झाली. हे मोदी-शहा यांचे मोठे कारस्थान आहे. एका रेपिस्ट पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ज्याच्यावर खुनाचा संशय आहे त्याला राज्यपालपदी नियुक्त केले, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.

काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अंकिता भंडारी हिच्या माता-पित्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांनी इंडिया गेटजवळ काही काळ आंदोलनही केले. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास अमित शहांच्या पोलिसांनी अंकिता भंडारी हिच्या माता-पित्यांना अटक केली. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना राज्यपाल केले. ही या देशाची स्थिती आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

यावेळी संजय राऊत यांनी एसआयआर, ज्ञानेश कुमार यांच्या घोटाळ्या संदर्भात आणि पक्षपाती पद्धतीने राबवलेल्या निवडणूक यंत्रणेसंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकांचाही उल्लेख केला. काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी एकूण 11 याचिका दाखल केल्या असून त्यावर आज सरन्यायाधीशांसमोर सुनावणी होईल.

ही रस्त्यावरची लढाई असून आम्ही सुप्रीम कोर्टाच्या दारात उभे आहोत. ही याचिका दाखल करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनता जमली. राहुल गांधी यांच्यासह आम्ही सगळे साडे पाच ते सहा तासांचा प्रवास करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. याबाबत आम्ही आशावादी असून बाहेर काय चालले आहे, लोकांमध्ये किती खदखद आणि असंतोष आहे हे सुप्रीम कोर्टालाही कळते. त्यामुळे आमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे वाटते, असे संजय राऊत म्हणाले.