
बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा अजब कारभार समोर आला आहे. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेशी संबंधित एका खासगी रूग्णालयाने रूग्णांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले. त्या खासगी रूग्णालयाला शिबिरासाठी चक्क प्राथमिक रूग्णालयाची जागा उपलब्ध करून दिली. एवढ्यावरच हे थांबले नाहीत तर खासगी रूग्णालयाच्या मोफत कॅम्पसाठी शासकीय डॉक्टरांची टिम बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी दावणीला बांधली. तब्बल २२ जणांची टिमच या कॅम्पच्या दिमतीला पाठवून दिली. त्यात जवळपास सर्वच तज्ञ आहेत. २२ प्रमुख डॉक्टरांची टिम जर कॅम्पसाठी दिली तर जिल्हा रूग्णालयाचा कारभार कोण हाकणार, जिल्हा रूग्णालयावरील डॉक्टरांवर येणारा ताण कोणावर टाकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य यंत्रणाची सुविधा देणारे ३५ मोठे मल्टीस्टेट रूग्णालय आहे. अलिकडच्या काळात ही सुविधा घेणार्या रूग्णालयात रूग्णांचे कॅम्प घेण्यात यावे असा नियम काढण्यात आला. त्यानंतर बीडच्या संजीवनी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पीटलने त्या योजने अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे ताडसोन्ना येथे आयोजन केले. हे शिबीर शनिवारी होत आहे. या खासगी मल्टीस्पेशालिस्ट रूग्णालयाने आयोजित केलेल्या शिबिरासाठी बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील प्राथमिक रूग्णालयाची इमारत दिली गेली. एक दिवसाच्या या कॅम्पसाठी संजीवनी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटलने बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना मनुष्यबळ देण्याची विनंती केली आणि बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी २२ जणांची नियुक्तीच शिबिराच्या तैनातीसाठी काढली. या २२ जणांच्या टिममध्ये वेगवेगळ्या विषयाचे तज्ञ आहेत. जिल्हा रूग्णालयातील ही यंत्रणा खासगी आरोग्य शिबिरासाठी दिल्यानंतर जिल्हा रूग्णालयामध्ये उपचारासाठी येणार्या रूग्णांवर उपचार कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर राबवायचे असेल तर मग ते खासगी रूग्णालयाचा प्रचार कशासाठी करत आहे. जिल्हा रूग्णालयातच असे शिबीर आयोजित करता येवू शकतात असा प्रश्न पडला आहे.
अलिकडच्या काळात बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कशी कुचकामी ठरत आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे. वरिष्ठ अधिकार्यांचा मनमानी कारभार वाढला आहे. यातूनच जिल्हा रूग्णालयाची शासकीय यंत्रणा खासगी रूग्णालयाच्या सेवेसाठी दावणीला बांधली आहे.



























































