मुद्रा – पारंपरिक लावणीची सखी हरपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

आपल्या नृत्य व अभिनयाची अनोखी मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी व अभिनेत्री मधु कांबीकर यांचे नुकतेच निधन झाले.  लावणी हाच श्वास आणि ध्यास असणाऱ्या मधुताईंना वाहिलेली ही शब्दांजली.    

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या निधनाने पारंपरिक लावणीचा एक समृद्ध, हुकमी आणि अस्सल चेहरा हरपला आहे. लोकरंगभूमी, नागर रंगभूमी, दूरदर्शन आणि रुपेरी पडदा अशा सर्वच माध्यमांवर आपल्या नृत्य व अभिनयाची अनोखी मोहोर उमटवणाऱ्या मधुबाईंचा लावणी हाच श्वास आणि ध्यास होता.

मधुबाईंची ही निष्ठा मी अगदी जवळून अनुभवली आहे. नागपूर येथे महिला व बालविकास विभाग आणि लोकरंग सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. या संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी माझ्यावर होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनात मधुबाईंनी लोककलावंतांच्या उपेक्षेवर आणि व्यथांवर सडेतोड भाषण करत मुख्यमंत्र्यांसमोरच वाचा फोडली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत त्यांच्या या करारी भाषणाचे मथळे झळकले होते.

त्याच संमेलनात दीपाली विचारे यांनी बसवलेला ‘रुपेरी लावणी’ हा कार्यक्रम होता. डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘एक होता विदूषक’ चित्रपटातील गाजलेली लावणी सादर करण्याचा आग्रह मी मधुबाईंकडे धरला. त्यावेळी त्यांना 102 अंश ताप होता. त्या म्हणाल्या, ‘खांडगे सर, माझी तब्येत ठीक नाही, एवढ्या वेळी सोडून द्या.’ पण माझ्या हट्टामुळे आणि ढोलकीपटू पांडुरंग घोटकर यांच्या ‘मधु, तू अध्यक्ष आहेस; लावणी करताना शेवटचा श्वास गेला तरी चालेल, पण रसिक खूश झाले पाहिजेत’ या प्रेरणेने त्यांनी तत्काळ पदर खोचला. ‘भरलं आभाळ पावसाळी पाव्हणा…’  ही लावणी त्यांनी त्याच तडफेने आणि ऊर्जेने सादर केली.

मधु रत्ना कांबीकर ही त्यांची संगीत बारी. लालबागच्या न्यू हनुमान थिएटरमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले. तिथेच त्यांनी पांडुरंग घोटकर यांच्याकडून शास्त्रीय लावणी व नृत्याचे धडे घेतले. शंकर तात्या जावळकर यांची हार्मोनिअम, घोटकर बुवांचा तबला-ढोलकी आणि आशा मुसळे यांचे गायन अशा गुणी साथीदारांसह त्यांनी रसिकांची सेवा केली. पुण्याच्या बाळासाहेब गोखले यांच्याकडून त्यांनी कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे कथ्थक आणि लावणी या दोन्ही शैलींवर त्यांचे प्रभुत्व होते.

कलेच्या जतन-संवर्धनासाठी त्या कमालीच्या आग्रही असत. लावणीची अवस्था ‘आयटम साँग’सारखी होत आहे याची त्यांना खंत होती. म्हणूनच त्यांनी ‘सखी माझी लावणी’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. एकदा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातील प्रयोगादरम्यान प्रेक्षकांतून ‘वन्स मोअर’ आणि शिट्ट्या आल्यावर त्या संतप्त झाल्या. त्यांनी स्टेजवर येत हात जोडून ठणकावले, ‘माझ्या कार्यक्रमात वन्स मोअर होणार नाही. पारंपरिक लावण्या कितीही म्हणा, पण टोप्या उडवणे आणि हावभाव करणे चालणार नाही; फक्त टाळ्या वाजवा.’ असा त्यांचा करारी बाणा होता.

न्यू हनुमान थिएटरमध्ये असताना मधुकर शेठ नेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘मुजरा घ्या सरकार’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ आणि ‘गाढवाचं लग्न’ या लोकनाट्यांत कामे केली. ताजमहाल हॉटेलमध्ये पंचतारांकित लावणी सादर करण्यापासून ते ‘शापित’ चित्रपटातील ‘राजा ललकारी अशी दे…’ या अजरामर गाण्यापर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. ‘देवापुढे माणूस’ आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटांतून त्यांनी रुपेरी पडदा गाजवला. तसेच ‘पुत्रकामेष्टी’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘फुलवंती’ आणि ‘पेइंग गेस्ट’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका अत्यंत गाजल्या. ‘लावणी भुलली अभंगाला’ या नाटकातदेखील चारुदत्त आफळे यांच्यासोबत मधु कांबीकर यांनी काम केले होते.

कीर्ती शिलेदार यांच्यासोबत नाट्यसंगीत आणि लावणीच्या एका संयुक्त कार्यक्रमात नृत्य करत असतानाच मुंबईतील एका नाटय़गृहात त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्या पुन्हा उभ्या राहिल्याच नाहीत.

पायातील चाळांशी शेवटपर्यंत इमान राखणाऱ्या या महान कलावंताच्या लावणीची अखेर विराणी झाली.

[email protected]

(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत.)