दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात 8 ठार, भरधाव बस 15 फूट खोल नाल्यात कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भाविकांना घेऊन जाणारी बस 15 फूट खोल नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील वृद्धांसह 17 जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे राजस्थानच्या कोटा जिह्यात घडली. ही बस भोपाळहून राजस्थानच्या खाटू श्याम मंदिराकडे जात होती. या बसमध्ये महिला, छोटय़ा मुलांसह 25 प्रवासी प्रवास करत होते.

हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची अद्याप माहिती समोर आली नाही. प्राथमिक तपासानुसार ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस नाल्यात कशामुळे कोसळली, यामागच्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. अपघातानंतर लगेच आपत्कालीन कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत बचावकार्य सुरू केले. मात्र, नाल्यामध्ये गाळ आणि पाणी साचल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले होते. अपघातानंतर 17 जणांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल तर 8 जणांना एमबीएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणलेल्यांपैकी 7 जणांना मृत घोषित केले. तर एमबीएस हॉस्पिटलमधील एका व्यक्तीला मृत घोषित केले.