
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीने सुरू केलेल्या आंदोलनाने देश ढवळून निघाला असून ‘जंतरमंतर’नंतर रामलीला मैदानावर ‘ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा’चा नारा घुमणार आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली होणार आहे. या रॅलीला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरसह निवडणुकांशी संबंधित अनेक निर्णय मनमानीपणे घेतल्याचे समोर आले आहे. अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी तसे लेखी आक्षेप नोंदवले होते. ते समोर आल्यानंतर मतचोरीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले. तेव्हापासून इंडिया आघाडीने ‘ज्ञानेश कुमार हटाव’ अशी हाक दिली आहे. देशातील निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात, अशीही इंडिया आघाडीची मागणी आहे. या मागण्यांसाठी इंडिया आघाडीतील विविध पक्षांकडून देशभर ‘लोकशाही वाचवा मार्च’ सुरू आहेत. आंदोलने, सभांचा धडाका सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून 1 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर महारॅली होत आहे.
नऊ दिवस मैदान खुले
महारॅलीसाठी काँग्रेसने दिल्ली पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. पोलिसांनी ही विनंती मान्य करून काँग्रेसला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार, 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत रामलीला मैदान आंदोलनांसाठी अधिसूचित करण्यात आले आहे. ही रॅली सुरळीत पार पडावी म्हणून पोलीस हे आयोजक, वाहतूक विभाग आणि अन्य संबंधित संस्थांशी समन्वय साधून आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.

























































