
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा सोहळा झाला. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब जाधव यांना संतोष पवार स्मृती पत्रकारिता, प्रशांत कदम यांना आचार्य प्र. के. अत्रे स्मृती पत्रकार पुरस्कार, अनुराग त्रिपाठी यांना पत्रमहर्षी बाबुराव पराडकर हिंदी पत्रकारिता पुरस्कार, जान्हवी मुळे यांना सावित्रीबाई फुले स्मृती पत्रकारिता, संतोष आंधळे यांना स्वातंत्र्यसेनानी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार, सुनील पाटील यांना स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख देवडीकर कृषी पत्रकारिता, सचिन परब यांना दत्ताजीराव तटकरे स्मृती पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले. अभय देशपांडे यांना नागोजीराव ऊर्फ अण्णासाहेब दुधगावकर स्मृती पत्रकारिता, महेश तिवारी यांना प्रमोद भागवत शोध पत्रकारिता, तर अविनाश महालक्ष्मे यांना भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरस्कारप्राप्त पत्रकारांच्या वतीने हेमंत देसाई व प्रशांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पुरस्काराच्या मागील भूमिका विषद केली. यावेळी शिवराज काटकर, किरण नाईक, शरद पाबळे, दीपक कैतके, राजा आदाटे, संजय मिस्किन, पांडुरंग म्हस्के, मनोज भोयर, दीपक पवार, गणेश जगताप, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
होय, आम्ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
पत्रकारांनी अंपायरसारखे राहिले पाहिजे! – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना पत्रकारितेवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केला. पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असतात. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांना हे भोगावे लागले आहे. मात्र, महाराष्ट्राला लढाऊ पत्रकारांची परंपरा आहे, याची आठवणही त्यांनी दिली. ‘पत्रकारांनी अंपायरसारखे राहिले पाहिजे. फुटबॉलचा रेफरी जसा खेळाडूंबरोबर धावत असतो आणि कोणी चूक केली की खेळाडू कोण आहे हे न बघता रेड किंवा यलो कार्ड देतो, तसे काम पत्रकारांनी केले पाहिजे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.


























































