दिवाळखोर सरकारची हातचलाखी; सादोळ्याच्या गाई मंजरथला दान! दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरोडा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उदय जोशी

राज्याला दिवाळखोरीच्या गर्तेत ढकलणाऱ्या फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्त शेतकयांना मदत करण्यासाठी चक्क सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरच दरोडा टाकला आहे! शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पाच हजार रुपयांचा अग्रीम देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी… पण घोषणा करण्याअगोदर त्यांनी तिजोरीतला खडखडाट पाहिलाच नव्हता! मदतीवरून बेअब्रू होऊ नये म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचा खिसा कापण्यात आला. एक परिपत्रक कर्मचाऱ्यांच्या माथी मारून एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फडणवीस सरकारचा हा द्रविडी प्राणायाम म्हणजे बीडकरांच्या भाषेत ‘सादोळ्याच्या गाई मंजरथला दान’ असाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. खरिपाच्या मशागतीचा संपूर्ण खर्च वाया गेला आहे. पाऊसच नसल्यामुळे रब्बीचीही आशा मावळली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आला आहे. खरिपाच्या हंगामातून येणारा पैसा दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत येतो. त्यामुळे बाजारात झगमगाट होतो. परंतु यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे भयानक सावट आहे. पंचनामे, पाहण्यांचे सोपस्कार झाल्यानंतर फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अग्रीम देण्याची घोषणा केली. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करण्यापूर्वी राज्याच्या तिजोरीत डोकावून पाहिलेच नाही. निवडणूक जिंकण्यासाठी लोकप्रिय घोषणांवर करण्यात आलेल्या उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत खडकूही शिल्लक नाही. लाखो कोटी रुपयांचे कर्ज फेडता फेडता सरकारच्या तोंडाला फेस आला आहे. दिवाळीसाठी शेतकऱ्यांना अग्रीम देण्याची घोषणा केली खरी, पण त्यासाठी पैसा आणायचा कोठून? त्यावर ‘सरकारी कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांसाठी’ अशी शक्कल लढवण्यात आली. त्यासाठी तातडीने एक परिपत्रक काढण्यात आले. ऑक्टोबर महिन्याचा पगार जमा होण्याच्या आतच त्यातून एक दिवसाचा पगार काढून घेण्यात येणार असून तो मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री निधीतून हा पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संबंधित खात्याकडे वळवण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

फडणवीस सरकारमध्ये दुष्काळामुळे खंगलेल्या शेतकऱ्याच्या ओंजळीत भरभरून मदत टाकण्याची कुवतही नाही आणि दानतही नाही. कोणाकडून तरी ओरबाडून घ्यायचे आणि कोणाच्या तरी पदरात टाकायचे, असे दलालीचे काम सध्या सरकार करत आहे. अशा भोंदू आणि बोगस सरकारकडून काय अपेक्षा करणार?

उल्हास गिराम, शिवसेना जिल्हाप्रमुख, बीड

पालकमंत्री शाही पाहुणचारातच मग्न!

पालकमंत्री सुनेत्रा पवार या अठरा वर्षांपासून पदवीधर मतदारसंघात ठाण मांडून बसलेले सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी शहरात दाखल झाल्या. सुनेत्रा पवारांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. जिल्हयात भीषण दुष्काळ असला तरी त्यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्जचे आडमाप पीक आले. दसरा तोंडावर आहे, दिवाळी येऊ घातलीय. शेतकऱ्यांच्या खिशात खडकू नाही, पण पालकमंत्र्यांच्या टोलेजंग सभा होत आहेत. गाड्यांची तर गणतीच नाही. स्वागतासाठी गुलाबाचा तीस फुटी हार! दुष्काळग्रस्तांच्या भळभळणाऱ्या जखमेवर मीठ ओतण्याचाच हा प्रकार !