मुंबईत सीजेपीचं आंदोलन, अंजली दमानियांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या कार्टर रोडवरती आज सीजेपीचं आंदोलन आहे. याच आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी स्वतः X वर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

आपल्या X पोस्टमध्येअन्जली दमानिया म्हणाल्या की, “”मुंबई पोलिसांनी मला आणि कुणालला खार सबवेमधून उचलले. का? तर आम्ही सॉलिडेरिटी वॉक करायला कार्टर रोडला निघालो होतो. आम्ही उबेर केली आणि खार सबवेपर्यंत पोहोचलो, तेव्हा आमची उबेर थांबवली. चहुबाजूंनी साध्या वेशात पोलीस आले आणि गाडीत बसले. आधी कुणालचा फोन खेचून घेतला आणि मग माझा… प्रचंड वादावादीनंतर आता फोन परत दिला.”

त्या म्हणाल्या की, “हेच महाराष्ट्राचे पोलीस कृष्णा आंधळेला आजपर्यंत शोधू शकले नाहीत. अशोक खरातसारख्या बलात्काऱ्याच्या बायकोला शोधू शकले नाहीत. आपल्या देशातील पोलीस पुलवामातल्या हल्लेखोरांना शोधू शकले नाहीत, पण सामान्य नागरिकांना मात्र अतोनात छळत आहेत. मारत आहेत, झोडपत आहेत. वाह रे वाह.”

दरम्यान, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त या संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेला आहे. अभिजीत दीपके, सौरव दास, नेहा बोरा यांच्या अटकेविरोधात हे आंदोलन केलं जातंय. मुंबई पोलिसांची या आंदोलनाला परवानगी नाहीये, मात्र तरी देखील हे सीजेपीचे आंदोलक या ठिकाणी आंदोलन करतायेत. आंदोलनात सहभाग घेतलेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे.”