पंजाबमध्ये भरधाव कारने मनरेगा मजुरांना चिरडले; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील लहरागागा-जाखल मार्गावर भरधाव कारने रस्त्यावर काम करणाऱ्या मनरेगा मजुरांना चिरडल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात 9 मजुरांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताच्या वेळी रस्त्यावर सुमारे 23 महिला आणि पुरुष मजूर काम करत होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला काम सुरू असताना समोरून आलेल्या एका भरधाव आणि अनियंत्रित कारने मजुरांना धडक दिली. या धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक मजूर जखमी झाले. लहरागागा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (एसएचओ) निरीक्षक जसकरण सिंह यांनी या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी मजुरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.