
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाची जर्सी अंगावर चढवायची, देशाचे प्रतिनिधित्व करायचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानच्या नावाने मैदानात उतरायचे, तर केवळ क्रिकेटमधील कौशल्याच्या जोरावर चालणार नाही. हिंदुस्थानी नागरिकत्व आणि पासपोर्टची अटही पूर्ण करावी लागेल, असा संदेश उच्च न्यायालयाने ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) दर्जा असलेल्या खेळाडूंना दिला. हिंदुस्थानकडून खेळण्याची महत्त्वाकांक्षा असेल, तर नागरिकत्वाचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्या, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले.
बीसीसीआयने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानी पासपोर्ट अनिवार्य करण्याच्या नियमाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीमुळे ओसीआय दर्जा असलेल्या खेळाडूंना हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
अन्य देशांमध्येही परदेशी नागरिकांना त्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची सहज परवानगी दिली जात नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हिंदुस्थान हा क्रिकेटमधील प्रगत देश आहे. येथे गुणवत्तावान खेळाडू घडवण्यासाठी मोठया प्रमाणावर मेहनत घेतली जाते. त्यामुळे ओसीआय दर्जा असलेल्या खेळाडूंना हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्याची मुभा देण्याबाबत न्यायालयाने सावध भूमिका मांडली.
2023 मध्ये पासपोर्टची अट; आधी नियमच नव्हता?
बीसीसीआयने 2023 मध्ये हिंदुस्थानी पासपोर्टची अट लागू केली. त्याआधी असा नियम अस्तित्वात नव्हता, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. एखाद्या स्थानिक खेळाडूने आक्षेप घेतल्यानंतर हा नियम करण्यात आला असावा, अशी बाबही सुनावणीदरम्यान मांडण्यात आली. मात्र हिंदुस्थानात क्रिकेट खेळण्याची संधी आणि देशाचे अधिकृत प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार या दोन स्वतंत्र बाबी असल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणातून अधोरेखित झाले.


























































