उदे गं अंबे उदे- नववी माळ – माजगावची चावडाई माता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो भक्तांची रक्षणकर्ती म्हणून खालापूरच्या माजगावमधील चावडाई मातेचा महिमा पंचक्रोशीत आहे. त्यामुळे याठिकाणी नऊ दिवस अखंड भक्तीचा गजर घुमतो. चावडाई मातेचे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधलेले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्री काळात विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने भाविक येतात.

माजगाव येथील या देवीची गावाचे रक्षण करणारी देवता म्हणून ख्याती आहे. महादू भोपी हे पूर्वी देवीची पूजा करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सुमारे ४० वर्षांपूर्वी हिरामण पाटील गुरुजी यांच्या स्वप्नात देवीने दर्शन दिल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. तीन महिन्यांपासून आजारी असताना देवीने स्वप्नात येऊन पूजा करण्यास सांगितले आणि त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याचा अनुभव गुरुजींनी व्यक्त केल्याचे ग्रामस्थ सांगतात. देवीच्या मंदिरासाठी यशवंत देवघरे यांनी जागा दिली आहे.

परंपरेचा वारसा जपणारे देवस्थान

मंदिरात चावडाई माता, मरीआई, वेताळ आणि चडोबा यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस घटस्थापना करून देवीची विधिवत पूजा-अर्चा केली जाते. चावडाई माता मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून माजगावच्या ग्रामस्थांच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे देवस्थान आजही भाविकांच्या श्रद्धेचा आणि गावाच्या धार्मिक परंपरेचा वारसा जपत आहे.

जव्हारची महालक्ष्मी

जव्हारच्या यशवंतनगर येथील महालक्ष्मी मंदिर हे जागृत देवस्थान आहे. १९ व्या शतकात या राजवंश्याकडून स्थापना करण्यात आल्याने या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मंदिराच्या स्थापनेनंतर १९८८ सालापासून या ठिकाणी दरवर्षी सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून महालक्ष्मी देवीची ख्याती आहे. ‘जव्हारची महालक्ष्मी’ कोकणातील एकमेव देवस्थान आहे. जव्हारचे राजे मुकणे यांनी या मंदिराची स्थापना केली. नवरात्रोत्सव काळात चैत्र शुद्ध पौर्णिमेस महालक्ष्मीचा एक धातूचा मुखवटा या मंदिरात ठेवला जातो. जव्हारच्या राजघराण्याकडून खणानारळांनी ओटी भरून व साडी-चोळी अर्पण करून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी मंदिरावर पाच मीटर उंचीचा भगवा झेंडा डौलाने फडकवण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा टिकून आहे. रोज देवीची पूजा, आरती, जागर असे धार्मिक विधी करण्यात येत आहेत.

मरीआई देवीचे स्थान

जव्हारच्या महालक्ष्मी मंदिराची बांधणी अशी आहे की, मंदिराच्या गाभाऱ्यात शिरताच समोर असलेल्या खिडकीतून दूरवर नजर टाकताच डहाणूच्या महालक्ष्मी डोंगराच्या सुळक्याचे दर्शन घडते. मंदिराच्या परिसरात राजे रजवाड्याच्या नावाने बांधलेल्या दगडी भव्य छत्र्या असून त्यात राजे रजवाड्याच्या पादुका आहेत. या मंदिराशेजारीच एक मरीआई देवीचे स्थान आहे. जव्हार संस्थानाचे राजे तिसरे पतंगशा यांनी जव्हारच्या महालक्ष्मीची यात्रा सुरू केली होती. यात्रेसाठी दूरवरून व्यापारी, सर्कसवाले, डोबारी, जादुवाले आदी जव्हारमध्ये येतात.