Manipur Violence – मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसाचार; एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हिंसाचारादरम्यान काही घरे आणि वाहने जाळण्यात आली. या घटनेनंतर बाधित भागांत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, रहिवाशांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, इम्फाळपासून 25 किमी दक्षिणेस खांगाबोक गावात एका मैदानावर रविवारी रात्री कार्यक्रम सुरू असताना काही लोकांनी तिथे दगडफेक केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर खांगाबोक आणि संगैयुमफम येथील दोन समुदायांच्या सदस्यांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर काही घरे आणि वाहने जाळण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, हिंसाचारादरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यात एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी लागली. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लैशराम राकेश असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दोन गावांमध्ये राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी खांगाबोक आणि संगैयुमफममधील रहिवाशांना रविवारी रात्री 11 वाजल्यापासून घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले होते. सोमवारी सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.