
खासगी शाळांमधून ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये आलेल्या 20 शिक्षकांचा पगार तांत्रिक कारणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पगाराबाबत ठोस कार्यवाही झालेली नसून दिवाळीपूर्वी सर्व शिक्षकांचे वेतन द्या अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
विविध खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे ऑगस्ट महिन्यात ठाणे पालिकेच्या विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. त्यानुसार हे शिक्षक सध्या ठाणे पालिकेच्या शाळांमध्ये नियमितपणे काम करीत आहेत. मात्र दोन महिन्यांपासून त्यांना ठाणे पालिका प्रशासनाने पगारच दिला नाही. वेतनाअभावी अनेक शिक्षकांच्या गृहकर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते तसेच इतर आर्थिक देणी थकली आहेत. संबंधित आर्थिक संस्थांकडून विलंब शुल्क व दंड आकारला जात असल्याने शिक्षकांवरील आर्थिक ताण अधिक वाढला आहे.


























































