
बांगलादेशच्या हवाई दलाचे माजी प्रमुख शेख अब्दुल हन्नान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कतारमध्ये अटक करण्यात आली आहे. बांगलादेशच्या भ्रष्टाचारविरोधी आयोगाने (ACC) दिलेल्या माहितीनुसार, कतारच्या सुरक्षा यंत्रणांनी हन्नान यांना १५ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले असून इंटरपोलमार्फत या कारवाईची अधिकृत माहिती बांगलादेशला देण्यात आली.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आणि कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार
निवृत्त एअर चीफ मार्शल शेख अब्दुल हन्नान यांच्यावर ज्ञात उत्पन्नापेक्षा ३.२८ कोटी टाकापेक्षा (बांगलादेशी चलन) अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांच्या ६ वैयक्तिक बँक खात्यांमधून २७.६३ कोटी टाकांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात समोर आले आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली होती.
पत्नीवरही गुन्हे, कॅनडा आणि दुबईत संपत्तीचे जाळे
या गैरव्यवहार प्रकरणात हन्नान यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पतीच्या मदतीने ज्ञात उत्पन्नापेक्षा १.९१ कोटी टाकांहून अधिक संपत्ती जमवली असून त्यांच्या नावावरील ३२ बँक खात्यांमधून १.१८ कोटी टाकांचे संशयास्पद व्यवहार आढळले आहेत. तपास यंत्रणांना हन्नान यांची कॅनडा आणि दुबईमध्ये परदेशी मालमत्ता असल्याचे पुरावे मिळाले असून त्यांच्या मुलांच्या नावावर तीन वेगवेगळ्या देशांमध्ये संपत्ती असल्याचे उघड झाले आहे.
प्रवासावर बंदी असतानाही देश सोडला
ढाका येथील न्यायालयाने यापूर्वीच हन्नान आणि त्यांच्या पत्नीचे प्राप्तिकर रेकॉर्ड जप्त करण्याचे, त्यांची दोन घरे सील करण्याचे आणि बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले होते. देशाबाहेर जाण्यावर बंदी (Travel Ban) आणि अनेक भ्रष्टाचाराचे खटले प्रलंबित असतानाही हन्नान बांगलादेशातून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. अखेर कतारमध्ये त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
हसिना सरकारच्या काळातील नियुक्ती
शेख अब्दुल हन्नान १९८४ मध्ये बांगलादेश हवाई दलात पायलट म्हणून रुजू झाले होते. १२ जून २०२१ रोजी त्यांनी १६ वे हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आणि ११ जून २०२४ रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांची ही नियुक्ती पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या अवामी लीग सरकारच्या काळात झाली होती. याच कालावधीत नियुक्त झालेले माजी नौदल प्रमुख ॲडमिरल मोहम्मद नजमुल हसन यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असून ते सध्या परदेशात आहेत.




























































