
कोरोना काळात संपूर्ण भारतातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती, कालांतराने ही रेल्वे सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात झाली आणि ZBTT (झीरो बेस्ड टाइम टेबल) अंतर्गत काही गाडय़ांचे थांबेसुद्धा रद्द करण्यात आले. या कोरोना काळात काही पॅसेंजर गाडय़ा अतिआवश्यक कामगारांसाठी सुरू करण्यात आल्या. परंतु त्यांना मेल एक्सप्रेसचा दर्जा देऊन आणि त्याचे तिकीट दरसुद्धा मेल एक्सप्रेसचे आकारले गेले.
आज कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या सर्व गाडय़ा म्हणजे मेल एक्सप्रेस, पॅसेंजर, शटल, मेमू, लोकल पूर्वीप्रमाणेच धावू लागल्या आहेत, तथापि काही शटल, पॅसेंजर, मेमू गाडय़ांचा दर्जा अजूनही मेल एक्सप्रेस असाच ठेवण्यात आला आहे.अशा या निर्णयाने प्रवाशांना तिकीट दरात जवळजवळ सात पट रक्कम जास्तीची मोजावी लागत आहे. जसे की पालघर ते केळवे रोड द्वितीय श्रेणीचे 5 रुपये लागतात तेथे 35 रुपये आकारले जात आहे आणि हे समजण्यापलीकडले आहे.
विरार-डहाणू दरम्यान खालील गाडय़ा या मेल एक्सप्रेस म्हणून धावत आहेत. ज्यांना पूर्वी सर्व सामान्य द्वितीय श्रेणी तिकीट दर लागू होते.
19101/102 भरूच-विरार मेमू
19001/002 सुरत-विरार शटल
19425/26 मुंबई सेंट्रल-नंदुरबार
पॅसेंजर
19417/18 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद पॅसेंजर
असे कळले आहे की, या गाडय़ांना मेल एक्सप्रेसचा दर्जा का देण्यात आला आहे तर या गाडय़ा सुटण्याच्या ठिकाणापासून 200 किमी पेक्षा जास्त अंतरापर्यंत धावतात. तथापि हा निकष कशाच्या आधारावर लावण्यात आला आहे, हे सर्वसामान्य प्रवाशांना पडलेले मोठे कोडे आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर
19055 वांद्रे-उधना ही गाडी वांद्रे येथून सकाळी 9ः00 वा. सुटून उधना येथे दुपारी 15ः05 वाजता पोहचते. त्याच्या नंतर सुटणारी 19015 सौराष्ट्र एक्सप्रेस दादरहून सकाळी 9ः30 वा. सुटून उधना येथे दुपारी 14ः35 पोहचते.
19001 विरार- सुरत शटल विरार येथून संध्याकाळी 17ः00 वाजता सुटून सुरत येथे रात्री 23ः20 पोहचते तर त्याच्या नंतर निघणारी 12921 फ्लाइंग राणी मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी 17ः55 (विरार 18ः45 पास होते)ती सुरत येथे रात्री 22ः35 वाजता पोहचते.
सांगण्याचे तात्पर्य म्हणजे मागून निघालेल्या गाडय़ा इच्छित स्थानकात आधी पोहचल्या जातात आणि या शटल, पॅसेंजर गाडय़ांना सायडिंगला काढून ठेवले जाते. परंतु यांना मेल एक्सप्रेसचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या शटल, पॅसेंजर आणि मेमू गाडय़ांची आणि मेल एक्सप्रेस गाडय़ांची तुलना फक्त 200 पेक्षा जास्त किलोमीटर पर्यंत जाते/धावते म्हणून तिकीट दर मेल एक्सप्रेसचे आकारले जात असेल तर ते खूपच अन्यायकारक असून निंदनीय म्हटले तर चुकीचे नसेल. या गाडय़ा सुटण्याच्या ठिकाणापासून ते शेवटच्या स्थानकापर्यंत सर्वच ठिकाणी थांबतात, तर मेल एक्सप्रेस गाडय़ा फक्त काही मोजक्याच स्थानकात थांबतात. कुठल्या निकषांवर, कुठल्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे हे न्यायिक दृष्टीने निर्णय होणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामन्य प्रवाशांसाठी कितीही किलोमीटर धावणाऱया पॅसेंजर गाडय़ा असोत त्या पॅसेंजर गाडय़ाच राहिल्या. सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱया सेवा म्हणून तशाच उपलब्ध ठेवल्या गेल्या जर रेल्वे प्रशासनाला भाडेवाढ करायची असेल तर नक्कीच करा, लांबच्या अंतरासाठी 100 रुपये तिकीट असेल तर तुम्ही 125 रुपये करा, किमान तिकीट 5 रुपये असेल ते 10 रुपये करा, परंतु या पॅसेंजर गाडय़ांचे तिकीट दर एकदम 7 पट करणे, मेल एक्सप्रेसच्या तिकीट दराची रक्कम त्यासाठी आकारली जाणे, हे न पटणारे आहे. रेल्वे प्रशासन याची दखल घेईल अशी आशा आहे आणि शटल, पॅसेंजर आणि मेमू गाडय़ांचा दर्जा पूर्वीप्रमाणेच तसाच कायम ठेवून सामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास सहकार्य करेल.






























































