
सूर्यमालेतील दोन सर्वात तेजस्वी आणि बलाढ्य ग्रह, ‘शुक्र’ आणि ‘गुरू’ उद्या एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार आहेत. खगोलशास्त्रामध्ये याला ‘ग्रहांची युती’ असे म्हटले जाते. ही युती महाराष्ट्रासह देशभरातून उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार असल्याने खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे. नॅशनल जिओग्राफिक’ संस्थेने त्यांच्या वृत्तात या अद्भुत खगोलीय घटनेचे ‘कॉस्मिक किस’ असे वर्णन केले आहे.
९ जून रोजी सूर्यास्तानंतर साडेसात ते साडेआठच्या दरम्यान पश्चिम आकाशात हे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. पृथ्वीवरून हे दृश्य पाहताना शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह एकमेकांच्या शेजारी अवघ्या १.५ ते १.६ कोणीय अंतरावर चमकताना दिसणार आहेत. अंधार पडू लागताच पश्चिम क्षितिजावर मिथुन आणि कर्क राशीच्या दरम्यान हिऱ्यासारखा लखलखणारा शुक्र आणि त्याच्या शेजारी काहीसा पिवळसर रंगाचा भव्य ग्रह गुरू नागरिकांना स्पष्टपणे पाहता येणार आहे. ७.४५ ते ८.१५ ही वेळ निरीक्षणासाठी सर्वोत्तम असल्याचे खगोलशास्त्रांनी सांगितले.
अंधश्रद्धेला बळी पडू नका
ग्रहांच्या युतीमुळे मानवी जीवनावर किंवा राशींवर कोणतेही ज्योतिषीय प्रभाव पडत नसल्याने नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे आवाहन जळगावचे पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.
अंतराळातील सुंदर ‘दृष्टीभ्रम’ ग्रहांची युती म्हणजे अंतराळातील एक सुंदर ‘दृष्टीभ्रम’ असल्याचे मत खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. युतीदरम्यान शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे १८ कोटी किलोमीटर अंतरावर आणि गुरू हा तब्बल ९० कोटी किलोमीटर अंतरावर असणार आहे. त्यांच्यातील प्रत्यक्ष अंतर कोट्यवधी किलोमीटरचे आहे. हे ग्रह पृथ्वीवरून पाहताना एका सरळ रेषेत येतात तेव्हा अशी युती घडून येत असल्याचे खगोलशास्त्रांनी सांगितले.



























































