कंत्राटी बसेसच्या कारभारावर बेस्ट उपक्रमाचे नियंत्रण नाही! मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी शिवसेनेची आक्रमक भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best_undertaking_logo

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील कंत्राटी बसेसचे अपघात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण कंत्राटी बसेसच्या कारभारावर बेस्ट उपक्रमाचे कोणतेही प्रभावी नियंत्रण उरलेले नाही ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण गंभीररित्या वाढले असून हे अपघात रोखण्यासाठी तातडीने योग्य ती पावले उचला, उपाययोजना आखा, अशी आग्रही मागणी करीत शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी सोमवारी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले.

पूर्वी बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस असताना वेग मर्यादेकरिता त्यात स्पीड गव्हर्नरची सुविधा होती. तसेच चालकांना भरतीच्या प्रक्रियेनंतर सुरक्षित व ठराविक वेग मर्यादेत बस चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. मात्र सध्या कंत्राटी बसेसच्या चालकांना कोणतेही आवश्यक प्रशिक्षण न देता मुंबईच्या रस्त्यांवर प्रवाशांची ने-आण करण्यासाठी सामावून घेतले जात आहे. अपघातांचे प्रमाण अत्यंत गंभीररित्या वाढण्यामागे हे मुख्य कारण आहे, असे खासदार अनिल देसाई यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्पीड गर्व्हनरचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून सर्वप्रथम सर्व कंत्राटी इलेक्ट्रीक बसेसना तातडीने स्पीड गर्व्हनर बसवण्यात यावे, अशी प्रमुख मागणी पत्राद्वारे केली आहे.

चालकांना पुरेसे प्रशिक्षण द्या, पात्रता पारखून सेवेत घ्या!

कंत्राटी चालकांची पात्रता पूर्णपणे पारखण्यात तावी तसेच त्यांना मुंबईच्या वाहतुकीचे आणि सुरक्षिततेचे व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यानंतरच सेवेत सामील करून घ्यावे, मुंबईकरांचा बेस्ट प्रवास पूर्वीप्रमाणे सुखकर व सुरक्षित करण्यासाठी तत्काळ योग्य ती पावले उचलावीत, अशा विविध मागण्यांकडे शिवसेनेने बेस्ट उपक्रमाचे लक्ष वेधले आहे.

पादचारी, प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका

कंत्राटी स्वरुपावर बेस्ट उपक्रमात सामील झालेल्या नवीन इलेक्ट्रीक बसेसना वेगमर्यादा निश्चित केलेली नाही. या बसेसमध्ये ‘स्पीड गर्व्हनर’ नसल्यामुळे अनेकदा या बसेस अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणाने धावताना दिसतात. त्यामुळे पादचारी, प्रवासी आणि रस्त्यावरील इतर वाहनधारकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे, असेही पत्रात म्हटले आहे.