ऍडगुरू ऍलेक पदमसी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अलेक पदमसी, अॅडगुरू

सामना ऑनलाईन । मुंबई

ऍडगुरू आणि नाटय़कर्मी ऍलेक पदमसी यांचे शनिवारी पहाटे मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. रविवारी वरळीतील स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कला, नाटय़, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त केले.

लिंटास या जाहिरात कंपनीचे सीईओ झाल्यावर त्यांनी या एजन्सीला देशातील पहिल्या क्रमांकाची एजन्सी बनवली. सामान्यांतील असामान्य व्यक्तिमत्त्व शोधून त्याचा जाहिरातींमध्ये वापर करण्याची कला त्यांनी चांगली अवगत होती. तोच त्यांच्या ब्रॅण्डिंगचा यूएसपी होता. त्यामुळेच लिंटास म्हणजे ऍलेक पदमसी असे समीकरण बनले.

1928 साली कच्छी खोजा मुस्लिम समाजात जन्म झालेल्या पदमसी यांनी जाहिरातींबरोबर अभिनय आणि नाटय़ निर्मितीही केली. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकात काम केले. जगभर गाजलेल्या रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ या हॉलीवूडपटात त्यांनी केलेली बॅरिस्टर जीना यांची भूमिका लक्षवेधी ठरली. 60 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी  70 नाटकांची निर्मिती केली. नाटय़, जाहिरातीतले योगदान लक्षात घेऊन त्यांना 2000 साली ‘पद्मश्री’ देण्यात आला.

अॅडगुरू आणि ब्रॅण्डगुरूही 

पदमसी यांना ग्राहकाला नेमके काय हवे हे माहीत असायचेच, पण त्याची जाहिरातबाजी कशी करायची याची कल्पकताही त्यांच्याकडे होती. म्हणून सर्वसामान्य दिसणारी ‘ललिताजी’ आणि ‘सर्फ’ घराघरात पोहोचली. बजाज स्कूटरची ‘बुलंद भारत की, बुलंद तस्वीर…हमारा बजाज’, ‘चेरी ब्लॉसम’ असो की, ‘एमआरएफ टायर’ आणि ‘लिरील’ साबण त्यांनी घराघरात पोहोचवला. ते काळाच्या पुढे जाऊन विचार करत, तो लोकांना समजेल अशा सुंदर पद्धतीने मांडून तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. स्पर्धेत मागे पडलेले आणि नवीन वस्तू ब्रॅण्ड म्हणून बाजारात प्रस्थापित करण्याचे काम त्यांच्या जाहिरातींनी केले.