व्होट चोरी नंतर आता सीट चोरी, काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी आगामी राज्यसभा निवडणुकांच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. काँग्रेसच्या वतीने दिल्लीत आज पत्रकार परिषद घेत घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार जयराम रमेश आणि के.सी. वेणुगोपाल यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

यावेळी बोलताना के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, “कोणत्याही ठोस कारणाशिवाय मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. दुसरीकडे ज्यांच्या उमेदवारी अर्जात अनेक त्रुटी आहेत, त्यांचे अर्ज मात्र स्वीकारले जात आहेत. आजच्या लोकशाहीची ही अत्यंत दयनीय अवस्था आहे.” हा प्रकार व्होट चोरी नंतर आता उघडपणे सीट चोरी असल्याचा घणाघात त्यांनी केला.

याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना धरणे आंदोलन करावे लागले, तरीही २४ तासांनंतरही आयोगाने कोणताही निर्णय न घेतल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “आम्ही या विरोधात कायदेशीर आणि राजकीय स्तरावर लढा देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.

वेणुगोपाल यांनी देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीवरूनही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. जनता संकटात आहे, पण सरकार कोणतीही कारवाई करत नाहीये. बेरोजगारी सध्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे, MSME क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे आणि देशातील तरुण व विद्यार्थी आपल्या भविष्याबद्दल अत्यंत चिंतेत आहेत.”