
दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या टोळीला गजाआड करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्र्ाांसह पाच लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील खंडाळा शिवारात ही कारवाई करण्यात आली आहे.
सिकंदरसिंग शक्तिसिंग ज्युनि. (वय 38), जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक, दलसिंग बालासिंग टाक (सर्व रा. आलाना, गेवराई, ता. जि. संभाजीनगर), शाह अन्सार मंजूर शाह (वय 21, रा. चितेगाव, ता. पैठण, जि. संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा शिवारात काहीजण घातक शस्त्र्ाांसह दरोडा घालण्याच्या तयारीने संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथकाने तातडीने तेथे धाव घेत खंडाळा परिसरात संशयितरीत्या फिरणाऱयांचा शोध घेत असताना चारजण हायवेलगत लावलेल्या एका क्रुझर गाडीत बसलेले आढळले. पोलीस आल्याची चाहूल लागताच, दरोडेखोरांनी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खंडाळा ग्रामस्थांच्या मदतीने नगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास चौकात ही गाडी पकडण्यात आली. यावेळी गाडीतील चारजणांना ताब्यात घेण्यात आले. गाडीची झडती घेतली असता, विविध प्रकारचे लोखंडी पान्हे, लोखंडी रॉड, कोयते, क्रू ड्रायव्हर, रस्सी, लोखंडी साखळी, बिळा, लोखंडी पाईप, लोखंडी हूक पाईप असा 5 लाख 12 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी जितेंद्रसिंग टाक या आरोपीवर 11 गुन्हे दाखल असून, आरोपी सिकंदरसिंग ज्युनि. याच्यावर चार गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली आहे.
नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, रणजित मारग, शिवाजी ढवळे, अंमलदार संतोष लगड, कैलास इथापे, आनंद घोडके, सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग, विशाल टकले, चालक विकास शिंदे, होमगार्ड भाऊसाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.































































