2035 पर्यंत राज्यातील सर्व एसटी बस इलेक्ट्रिक होणार, परिवहन मंत्र्यांची माहिती 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी 2035 पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट शासनाचे आहे. सध्या कार्यरत बससह नव्याने खरेदी होणाऱ्या बसचा समावेश या योजनेत करण्यात येणार असून, जुन्या बसचेही टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर केले जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
विधान परिषदेत आमदार श्रीकांत भारतीय यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाने 5,150 इलेक्ट्रिक बस घेण्याचा करार केला असून, त्यापैकी 900 हून अधिक बस महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. या करारानुसार राज्यात 172 चार्ंजग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 39 चार्ंजग स्टेशन पूर्ण झाली असून, आणखी 45 स्टेशन पुढील तीन महिन्यांत कार्यान्वित होतील. उर्वरित स्टेशनही लवकर पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळ संबंधित पंपनीशी समन्वय साधत आहे.

दुर्गम, डोंगराळ भागात 200 मिनी बसेस

पालघर जिह्यातील डहाणू व जव्हार डेपोला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील. डोंगराळ व दुर्गम भागात मोठय़ा बसेस पोहोचू शकत नसल्याने पुढील दोन महिन्यात राज्यासाठी आणखी 200 मिनी बसेस उपलब्ध होतील, असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले. निरंजन डावखरे यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता.

दोनशेहून अधिक खासगी बसवर कारवाई

एसटी डेपोच्या 200 मीटर परिसरात बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक सुरू असल्याची कबुली परिवहन मंत्र्यांनी दिली. अशा खासगी बसविरोधात मोठय़ा प्रमाणावर कारवाई सुरू असून आतापर्यंत 200 हून अधिक खासगी बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. बस डेपोचे आधुनिकीकरण, चालक-वाहकांसाठी निवास व्यवस्था तसेच आवश्यक सुविधांसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.