
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड या प्रकरणांमुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याना आपण निलंबित केले होते. त्यामुळे, दोघांनी एकत्र येऊन मला अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप केले. दोघांच्या मागे कुणीतरी मास्टरमाइंड आहे, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
तब्बल 21 महिन्यानंतर ते नागपुरात परतले. यावेळी विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात असले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड ही दोन्ही प्रकरणे गंभीर होती. ही प्रकरणे गृहमंत्री असतानाही माझ्यापासून लपवून ठेवली गेली. त्यामुळे सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना निलंबित केले. कालांतराने वाझे यांना बडतर्फही केले. परमबीर सिंहांच्या ऐकीव माहितीवरून माझ्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे तथ्यहिन आरोप झाले. परंतु, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात हे आरोप खोटे ठरले आहेत. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातही 100 कोटींऐवजी 1.71 कोटी रुपये दाखवले गेले. या आरोपांमागे कोणती शक्ती होती, हे माझ्यापेक्षा पत्रकारांनाच जास्त माहीत असल्याचा टोलाही देशमुखांनी लगावला.
मी आता या मास्टरमाइंडची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याची माहिती पत्रकारांनाही सांगीन,असेही देशमुख म्हणाले. सचिन वाझेच्या जबानीवरून मला अटक करण्यात आली. परंतु, वाझेवर दोन खुनांचे आरोप असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचे जबानी ग्राह्य धरता येणार नसल्याचेही न्यायालयाने सांगितल्याचे देशमुख म्हणाले.
































































