
>> एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)
जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या मुख्य कॅम्पस्वर मिराज विमानांनी केलेला हवाई हल्ला अभिमानास्पद होतो. कश्मीरमधील पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ती एक श्रद्धांजलीच ठरली. हवाईदलाच्या मिशननंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेतच. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे. पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी तयार राहताना सीमा सुरक्षेच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानविरोधात राबवल्या जाणाऱया कारवाईबाबतचं हे विश्लेषण.
आपण पाकिस्तानविरुद्ध यापूर्वी लष्करी सर्जिकल स्ट्राइक केलेला होता. यावेळी मात्र आपण हवाई दलामार्फत नियंत्रित हल्ल्याचा दुसरा पर्याय निवडला. मध्यरात्री 2 ते 4 या वेळेत बहुतांश सर्वजण गाढ झोपेत असतात किंवा गाफील असतात. त्याचाच फायदा घेऊन अत्यंत सतर्कतेने हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर हल्ला केला.
या हल्ल्यासाठी ‘मिराज 2000’ ही 12 विमाने वापरण्यात आली. मिराज हे विमान अनेक वर्षे आपल्या ताफ्यात असून कारगील युद्धातही त्याचा वापर करण्यात आला होता. मिराज हे विमान प्रत्येकी 500 किलो वजनाचे सहा बॉम्ब घेऊन उड्डाण करू शकते. ते दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करू शकते. यामधून ‘लेझर गाइडेड बॉम्ब’ डागता येतात. त्याचाच वापर आपल्या वैमानिकांनी केला. त्यामुळे अचूक वेध करणे शक्य झाले. या विमानांच्या पथकासोबत ‘डीआरडीओ’ने विकसित केलेली व ‘एरबोर्न अर्ली कॉर्निंग ऍण्ड कंट्रोल सिस्टम’, रडार, ड्रोन यंत्रणा वापरण्यात आली. या पथकाच्या सुरक्षेसाठी अन्य विमाने सज्ज होती. या संपूर्ण कारवाईचा समन्वय योग्य पद्धतीने केला जात होता. हा हल्ला सुनियोजित आणि सुसूत्र असाच होता. या हल्ल्यात सर्वसामान्य नागरिकाचा बळी गेला नाही. कारवाई यशस्वी झाली. यातून हिंदुस्थानच्या हवाई दलाची क्षमता अधोरेखित झाली.
हिंदुस्थानने केलेल्या या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय समुदायही आपल्या बाजूनेच उभा राहील यात शंका नव्हतीच. चीननेदेखील पाकिस्तानलाच सल्ला दिला. अर्थात चीनचे धोरण हिंदुस्थानविरोधात पाकिस्तानला ‘बळ’ देणे हेच आहे. मात्र आपणच पोसलेल्या दहशतवादाचा तडाखा जसा यापूर्वी अमेरिकेला बसला तसा तो चीनलाही भविष्यात बसू शकतो. अर्थात, तसे झाल्यावरच चीनला जाग येईल. दहशतवादाला पोसून त्याचे निर्यात करायचे धोरण पाकिस्तानचे असल्याने पाकिस्तानच दहशतकादाची जननी आहे यात दुमत नाही. आता गरज आहे ती हिंदुस्थानमध्ये एकजूट निर्माण होण्याची. एकजूट असेल तर शत्रूला चोख उत्तर देता येते, पण एकजूट नसेल तर त्याचा गैरफायदा पाकिस्तानसारखा शत्रू उठवतो. मी नेहमीच म्हणत आलो आहे, आमच्याकडे नुसतीच संरक्षण सेना नाही, तर सशस्त्र सेना आहे. हा देश तरुणांचा आहे. जबरदस्त ताकद आपल्याकडे आहे. शिवाय तंत्रज्ञानही झपाटय़ाने विकसित होत आहे. त्याचा फायदा उठवून दहशवाद्यांचा बीमोड आपण नक्कीच करू शकतो.
जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या मुख्य कॅम्प्सवर मिराज विमानांनी केलेला हवाई हल्ला अभिमानास्पदच आहे. पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना दिलेली ती श्रद्धांजली आहे असेच मी मानतो. आता आपल्याला सतर्क राहिले पाहिजे. गाफील राहून चालणार नाही. पाकिस्तानच्या दहशतवादाचा जगाला त्रास होत आहे. त्यामुळे सर्व देश एकत्र येऊन चोख उत्तर देण्यासाठी त्यांनी तयार झाले पाहिजे. आता आपल्याकडचा बर्फ वितळू लागला आहे. तिथून घुसखोरी होऊ शकते. हे ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती कशी रोखता येईल याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.
सतर्कता हवी!
पाकिस्तानात या हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील. त्यामुळे हिंदुस्थानने सतर्क राहायला हवे. हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. हिंदुस्थानात असे दहशतवाद्यांचे तळ नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने हल्ला केला तर तो देशाच्या लष्कर, नौदल किंवा हवाई दलाच्या तळावरच करू शकेल. हा हल्ला केला तर ते थेट युद्ध ओढवून घेणारे ठरेल. तसे झाल्यास पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सक्षम आहेच.
शब्दांकन – मेधा पालकर, [email protected]





























































