
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
मुंबईवरील ‘26/11’च्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला आता दहा वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्त ताज पॅलेस हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल आणि नरीमन हाऊस या ठिकाणी घुसलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी खास नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) कमांडोजच्या खास तुकडीला बोलावण्यात आले होते. या कमांडोजनी ही कशी मोहीम फत्ते केली त्याची थरारक माहिती देणारा लेख…
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील हल्ला दहशतवादी असल्याची खात्री झाली आणि ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडोकरिता नॅशनल सिक्युरिटी गार्डला (एनएसजी) बोलावण्यात आले. या एनएसजीचे कार्यदल तीन गटांत विभागण्यात आले. ताज पॅलेस हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावरील कॉरिडोरची लांबी ही सरासरी 840 फूट आहे. हॉटेलची एकूण लांबी सरासरी 1.80 किलोमीटर आहे. एकूण परिसर 49,1400 चौरस फूट होता. 330 स्यूट, प्रत्येकात 2-3 खोल्या जनरेटर संयंत्रासहित, 140 अतिरिक्त खोल्या इत्यादी. याप्रमाणे 17 मजले होते. ताज टॉवर्समध्ये 21 मजल्यांवर एकूण 323 खोल्या होत्या.
27 नोव्हेंबरला 9.20 वाजता एनएसजीने मार्कोसकडून (एमएआरसीओएस) कार्य हाती घेतले आणि हॉटेलच्या मांडणीची योजना मिळवली. पहिल्यांदा ताज चेंबर्स व रेस्टॉरंट सुरक्षित करण्यात आले. ताज पॅलेसमध्ये तळमजला सुरक्षित करण्यात आला आणि कारवाईचा पाया तिथे स्थापन करण्यात आला. जिन्याने छतावर जाऊन वरून-खाली कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी ताजमध्ये असल्याचे निदर्शनास आले होते. मजले सुरक्षित करीत असताना पहिल्या मजल्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला होता. कॉरिडोरच्या डाव्या कोपर्यातून दोन दहशतवादी गोळ्या झाडत होते. पहिल्या मजल्यावर जात असताना एक एसएजी कमांडो जखमी झाला होता. त्याला मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी तळमजल्यावर ओढत आणले आणि त्याच्या गटाला तिथेच थांबण्यास सांगितले. त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार करत स्वतः तेथील जबाबदारी घेतली होती. त्याक्षणी अनपेक्षितपणे पहिल्या मजल्याच्या कॉरिडोरच्या उजव्या कोपर्यातून दोन दहशतवाद्यांनी गोळीबार करीत मेजर उन्नीकृष्णनला जखमी केले होते. दहशतवाद्यांना मारताना मेजर उन्नीकृष्णन जखमी झाले. ते पुढे शहीद झाले.
ओबेरॉय-ट्रायडेंट येथील ऑपरेशन
येथे 11 मजले, प्रत्येक मजल्यावर 33 खोल्या, तीन पातळ्यांवर एकमेकांना जोडलेले तीन कॉरिडोर होते. ताज हॉटेलप्रमाणे दहशतवाद्यांची संख्या कोणालाच माहीत नव्हती. 26 नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांनी पाहुण्यांवर गोळीबार केल्यानंतर ते खोलीमध्ये लपून बसले होते. ते आपली जागा बदलताना आणि एखाद्या ठिकाणी गोळीबार झाल्यास ते गोळीबार करत होते. ते 1856 क्रमांकाच्या खोलीत लपून बसले होते. ती खोली मास्टर की वापरून उघडताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. एक दहशतवादी बाहेर पडून लिफ्टकडे जात असताना कॉरिडोरमध्ये मारण्यात आला आणि दुसरा बाथरूममध्ये लपून बसला. ओबेरॉय हॉटेल 28 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता दहशतवाद्यांपासून सोडविण्यात यश मिळाले. सुरक्षिततेची प्रक्रिया पार पडल्यानंतर हॉटेल 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हस्तांतरित करण्यात आले.
नरीमन हाऊस येथील ऑपरेशन
नरीमन हाऊस हे दाट लोकवस्तीच्या शेजारी दक्षिण मुंबईत स्थित आहे. यहुदींचा निवास असणार्या क्षेत्रात राहणार्यांना तसेच कोणालाही आतील मांडणीबाबत माहिती नव्हती. निशाणा धरलेली तुकडी (Snipers) नरीमन हाऊसच्या आसपास तैनात करण्यात आली आणि बांधकाम सुरू असणार्या एका इमारतीत कमांड बेस स्थापित करण्यात आला. ती जागा नरीमन हाऊसमधून होणार्या गोळीबाराचे निरीक्षण करण्यास योग्य होती. इमारतीतील दहशतवाद्यांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या होत्या व त्याचे तुकडे जमिनीवर विखुरले होते. त्यामुळे कमांडो त्यावरून जाताना काचेच्या तुकड्यांचा आवाज होत असल्याने त्या आवाजाने दहशतवादी सतर्क होऊन कमांडोला लक्ष्य करीत होते.
हल्ला करणारा गट 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.15 वाजता हेलिकॉप्टरने इमारतीवर उतरला व सहकार्य करणारा दुसरा गट इमारतीवरून होणार्या गोळीबाराचे निरीक्षण करत होता. तालीम करण्यास अजिबात वेळ नव्हता. पहिल्यांदा सहावा आणि पाचवा मजला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात आला आणि आठ वाजता चौथ्या मजल्यावर दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित करण्यात आला होता.
हा तोच क्षण होता, जेव्हा हवालदार गजेंद्र सिंगने खोलीचे समोरील दार तोडून खोलीत प्रवेश केल्यावर आत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आयईडीच्या सहाय्याने दुसरा प्रवेश मार्ग तयार करण्यात आला. समोरील दरवाजाने आणि फोडलेल्या भिंतींतून समन्वयाने गोळीबार करण्यात येत होता आणि कमांडोंनी आतमध्ये प्रवेश करून दहशतवाद्यांना निष्फळ केले. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून 25 मिनिटांनी उद्देश सफल झाला.
एनएसजीच्या ऑपरेशनमध्ये एकूण आठ दहशतवादी मारले गेले आणि एनएसजीचे दोन कमांडो शहीद झाले, तर 18 जखमी झाले.
मेजर संदीप उन्नीकृष्णन, 7 बिहार, 51 एसएजी (मरणोत्तर) आणि हवालदार गजेंद्र सिंह, 10 पॅरा (एसफ), 51 एसएजी (मरणोत्तर) यांना देशातील सर्वात मोठे अशोकचक्र प्रदान करण्यात आले. ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडोसाठी 51 आणि 52 एनएसजीच्या विशेष कृती गटाला एक कीर्तिचक्र, एक शौर्यचक्र, सहा सेना मेडल्स (वीरता), एक सेना मेडल (विशिष्ट) आणि एक सीओएएस स्थलसेनाध्यक्ष प्रशस्ती कार्डाने गौरविण्यात आले.































































