लेख : भल्यासाठी समतोल आणि लिंगसमभाव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मनीषा सबनीस

महिला दिनाच्या निमित्ताने, बॅलन्स फॉर बेटर या संकल्पनेच्या आधाराने स्वतःकडे पाहूया. स्वतःचे आरोग्य, शारीरिक आणि मानसिक, स्वतःच्या आवडी, स्वतःची ध्येये इ.इ. परत एकदा ऐरणीवर आणूया. तसेच एकास एक या समीकरणानुसार कुटुंब नाती-कर्तव्ये, कामे यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करूया. इतरांच्या बलिदान, त्याग विचार यामुळे आपल्याला मिळालेल्या मतदानाचा हक्क, लिंगसमभाव या मूल्यांची बूज राखूया आणि ‘बॅलन्स फॉर बेटर’ या उक्तीला न्याय देऊया.

प्रथेप्रमाणे याही वेळी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जाईल. हिंदुस्थानसारख्या उत्सवप्रिय देशाला समारंभ आणि एखादी गोष्ट साजरी करणे फार आवडतं. त्यामुळेच पाश्चात्यांचे विविध ‘डे’ज आपण मनापासून साजरे करतो. तसं तर बाईचं वेगवेगळय़ा नात्यांमधून असणं आपण साजरं करतोच. भाऊबीज, पाडवा इ. सणांमधून बहीण, पत्नी या नात्यांची आठवण आणि सन्मान आपण करतोच. ‘आई’ या नात्याचं उदात्तीकरण तर आपल्याइतकं इतर कोणत्याही संस्कृतीत केलं गेलं नसेल. पण या सगळय़ामध्ये निव्वळ ‘स्त्री’ला स्थान नाही. ती कोणाची तरी कोणी तरी असणं आवश्यक आहे. कुठल्या तरी नात्याने कोणाशी तरी जोडलेली  (की बांधलेली/जखडलेली?) असायलाच हवी. बघा ना, पुरुषाला आपण सहजच ‘तो माणूस चाललाय ना…’ असं म्हणतो नि बाईला माय म्हणतो. ‘ती बाई चाललीय ना’ म्हणजे बाई ही ‘माणूस’ नसतेच मुळी. ती असते फक्त बाई! इतक्या अभावितपणे आपण बाईचं माणूसपण पुसून टाकलंय, म्हणून तर आजही ‘महिला दिना’ची गरज भासते काय आहे या महिला दिनाची गोष्ट? कुठून सुरू झाला हा? सर्वसामान्यपणे ‘डे’ ही संकल्पना अमेरिकेची आहे असं आपल्याला वाटतं, पण या महिला दिनाची सुरुवात रशियामध्येसुद्धा झाली.

अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी रशिया, इंग्लंड, अमेरिकेत वस्त्रोद्योग तेजीत होता. तिथे स्त्री-पुरुष दोघेही काम करीत असत, पण स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जात होते. काम करण्याच्या ठिकाणीही बऱ्याच असुविधा होत्या. याच्या विरोधात स्त्रियांनी एकत्र येऊन संप केला आणि लढा पुकारला. तो संप मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण क्लास झेटकिंग या महिला नेत्याने निकराने तो चालू ठेवला. त्याचवेळी सेफ्रेजेट चळवळही जोरात सुरू होती. त्यामधील एमिली, पंजख्रस्ट, रुथचिल्ड या रशियन आणि इंग्लंडच्या नेत्यांनीही स्त्रियांच्या या लढय़ाला पाठिंबा दर्शविला. त्याला जोडून पुढे 1913 मध्ये रशियात आणखी काही मागण्या पुढे आल्या, पण तेव्हा दंगे उसळले आणि पुढे 2-3 वर्षे ही चळवळ थोडी मंदावली. 1917 साली पुन्हा एकदा रशियामध्ये मतदानाचा हक्क स्त्रियांना मिळावा यासाठी लढा उभारला गेला. पेट्रोगार्डमध्ये भरचौकात स्त्रियांनी आपल्या मागण्या खुलेपणाने आणि धाडसाने सरकारपुढे मांडल्या. त्याचवेळी न्यूयॉर्कमध्येही स्त्रियांनी मतदानाचा हक्क समान वेतन, कामाच्या ठिकाणी किमान सुविधा इ. मागण्यांसाठी धरणे धरले. 8 मार्च या दिवशी जुलियन कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारी हा दिवस आला आणि रशिया आणि अमेरिकेत एकाच दिवशी या घटना घडल्या. त्यानंतर 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला. नंतर 1975 हे महिला वर्ष म्हणून साजरे केले गेले. अमेरिकेत जन्मलेला हा महिला दिन हळूहळू जगाने स्वीकारला. आज अमेरिकेत याचे महत्त्व तुलनेने कमी झाले आहे. मात्र अन्य देशांत याचे स्वागत आजही उत्साहात केले जाते या वर्षीची महिला दिनाची संकल्पना आहे ‘बॅलन्स फॉर बेटर’. ‘भल्यासाठी समतोल साधा’. तसेच या वर्षी ‘लिंगसमभाव’ म्हणजे जेंडर इक्वालिटी यावरही काम करणे अपेक्षित आहे. म्हणजे युनोने तसे जाहीर केले आहे. आता या पार्श्वभूमीवर आपल्याकडची म्हणजे हिंदुस्थानात, महाराष्ट्रात महिला दिनाची काय परिस्थिती आहे याचाही विचार करायला हवा. महिला दिन हा आपल्या महिलांना किती महत्त्वाचा वाटतो आहे? की हा फक्त गंमत, मजा, सेलिब्रेशन या मार्गानेच साजरा करण्याचा आणखी एक दिवस असे समीकरण आपल्या मनात आहे? घटनाकारांमुळे आपल्या स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढा द्यावा लागला नाही. आपल्या पदरात ते सहजच पडले. आपल्या घटनेतच लिंगसमभाव आणि विज्ञाननिष्ठा स्पष्टपणे मांडलेली आहे. मग प्रश्न उरतो तो फक्त विचारपूर्वक आणि डोळसपणाने हे अधिकार प्रत्यक्षात आणण्याचा.

या वर्षीच्या महिला दिनाच्या संकल्पनेनुसार म्हणजे ‘बॅलन्स फॉर बेटर’ विचार करायचा झाला तर पटकन डोक्यात येतं की कुटुंब आणि करीयर याचा बॅलन्स. अर्थात हा विचार करणं आवश्यक आहेच. कारण आज अर्थार्जन आणि कुटुंब या दोन्ही क्षेत्रांत बाई लीलया वावरते आहेच. पण  त्याही पुढे जाऊन स्त्रियांनी खरा विचार करायला हवा आहे तो ‘मी आणि माझी कर्तव्ये’ यामधील साधावयाच्या समतोलाबद्दल सर्वसामान्यपणे काय होतं, आपण दैनंदिन जगण्याच्या लढाईत ‘मी’चं काय म्हणणे आहे, ‘मी’च्या काय गरजा आहेत, ‘मी’च्या काय आवडी आहेत, ‘मी’ला काय करायला आवडतं, काय नकोसं वाटतं, इ.इ. ‘मी’शी जोडलेल्या ‘मी’शी निगडित गोष्टी अगदी अडगळीत टाकतो नि त्या तशा अडगळीत टाकणं हेच ‘बाई’चं अस्सल ‘बाईपण’ मानतो आणि इथेच बाई तर फसतेच, पण समाजाचंही नुकसान होतं. सरळच आहे की अर्धी लोकसंख्या जर तनामनाने निरोगी, आनंदी नसेल तर समाज निरोगी कसा राहील? त्यामुळे महिलांनी जरा स्वतःकडे लक्ष द्यायला शिकायला पाहिजे. यात काही स्वार्थ वगैरे नाही हेही लक्षात ठेवायला पाहिजे. कारण स्वतःचा विचार स्वतः नाही करणार तर कोण करणार? तसंही मला ‘मी’ जितकी ओळखते तितकं दुसरं कोणी कसं ओळखू शकणार?

महिला दिनाच्या निमित्ताने, बॅलन्स फॉर बेटर या संकल्पनेच्या आधाराने स्वतःकडे पाहूया. स्वतःचे आरोग्य, शारीरिक आणि मानसिक, स्वतःच्या आवडी, स्वतःची ध्येये इ.इ. परत एकदा ऐरणीवर आणूया. याच्या बरोबरीने एकास एक या समीकरणानुसार कुटुंब नाती-कर्तव्ये, कामे यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करूया. काहीही झाले तरी स्वतःला वगळून इतर काही करण्याचा प्रयत्न फार दूरवर टिकत नाही हे लक्षात ठेवूया. कारण स्वतः दुःखी असलेली, थकलेली व्यक्ती इतरांना फार काळ सुखी, उत्साही राखू शकत नाही. त्यामुळे स्वतःमधलं माणूसपण जरा पृष्ठभागावर आणूया. बाईपण जरा आत ठेवूया. याच बरोबरीने भवतालचं भान आणि विचार करायलाही शिकूया. आपल्याला जे करावंसं वाटतं, जे करायची इच्छा आहे, भले ते कुटुंबासाठी असेल, समाजासाठी असेल किंवा स्वतःसाठी असेल ते करण्यासाठी पूरक पोषक अशी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे ना, तेही तपासून बघूया. सुरक्षितता आणि संपन्नता नसेल तर कोणाचीच कसलीच अपेक्षा पूर्ण होऊ शकत  नाही. त्यामुळे आपली सगळी वर्तुळे, माझे, माझ्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे आबाद आहेत ना? त्यासाठी मी काय करू शकते तेही तपासूया. कोण्या इतरांच्या बलिदान, त्याग विचार यामुळे आपल्याला मिळालेल्या मतदानाचा हक्क, लिंगसमभाव या मूल्यांची बूज राखूया आणि ‘बॅलन्स फॉर बेटर’ या उक्तीला न्याय देऊया. प्रत्येक व्यक्तीसाठी बॅलन्स करायच्या गोष्टी आणि बेटरची व्याख्या वेगवेगळी असणार आहे. पण आजच्या दिवशी किंचित उसंत काढून या दोन्ही व्याख्या स्वतःपुरत्या तरी निश्चित करूया आणि वर्षभर त्याची अंमलबजावणी करूया.

लेखिका अर्थतज्ञ आहेत.