केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 7 मेपर्यंत वाढवली; साखरेचे प्रमाण 217 वर गेल्याने दिले इन्सुलिन

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी 1 एप्रिलपासून तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची कोठडी 7 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील मतदानादरम्यानही केजरीवाल तुरुंगातच राहाणार आहेत. दरम्यान, केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी 217 वर गेल्याने त्यांना दोन युनिट इन्सुलिन देण्यात आले.

केजरीवाल यांची कोठडी 1 ते 15 एप्रिल त्यानंतर 23 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. केजरीवाल यांच्याशिवाय बीआरएस नेत्या के कविता आणि अन्य आरोपी चरणप्रीत यांच्या कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. के कविता यांच्यावर 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल असे ईडीने सुनावणीदरम्यान सांगितले. दरम्यान, ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली होती.

साखरेची पातळी 200 हून अधिक झाल्यास त्यांना कमी डोसचे इन्सुलिन दिले जाऊ शकते असे एम्सच्या पथकाने सांगितले होते, असे अधिकारी म्हणाले.

बजरंग बली की जय -अतिशी
हनुमान जयंतीच्या दिवशीच अत्यंत आनंदाची बातमी आली, केजरीवाल यांना अखेर इन्सुलिन देण्यात आले, अशी प्रतिक्रीया दिल्लीच्या कॅबिनेट मंत्री अतिशी यांनी एक्सवरून दिली.