
सामना प्रतिनीधी । नवी मुंबई
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या करून वसई खाडीत फेकलेला मृतदेह शोधण्यासाठी आता अमेरिकन कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे बिद्रे यांच्या मृतदेहाची शोधमोहीम पुन्हा वसई खाडीत सुरू होणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी आपल्या मीरा रोड येथील घरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची डोक्यात बॅटचा फटका मारून हत्या केली होती. त्यानंतर कुरुंदकर आणि त्याच्या सहकाऱ्याने अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे करून दोन गोणींमध्ये भरले आणि या गोणी लोखंडी वजन बांधून वसईच्या खाडीत फेकून दिल्या. या गोणींचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी दोन वेळा वसई खाडी ढवळून काढली. मात्र दोन्ही वेळा पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आता हा मृतदेह शोधण्यासाठी अमेरिकेच्या एका कंपनीने पुढाकार घेतला आहे. या कंपनीची यंत्रणा खाडीच्या तळाला जाऊन काम करणार आहे.

































































