
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ही देशातील दोन महान व्यक्तीमत्वे होती. दोघांनाही अमोघ आणि प्रभावी वक्तृत्वाची देणगी होती. दोघांना परस्परांबद्दल आदर होता. शिवचरित्र घराघरात पोहोचवणाऱया शिवशाहीरांच्या कार्यावर शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा कौतुकाची मोहोर उमटवली. पुरंदरे यांनीही शिवसेनेच्या कार्याला स्वराज्याचे कार्य म्हणून संबोधतानाच शिवसैनिकांना मावळ्यांची उपमा दिली होती.
‘बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वाचायला शिकवला. त्यांचे शिवचरित्र वाचले, ऐकले तरी शिवकाळ नजरेसमोर उभा राहतो. पावनखिंडीतील तो प्रसंग. बाजीप्रभू पालखी घेऊन चालले आहेत… महाराज पालखीत बसले आहेत… काय वर्णन आहे. आपणंच पालखीला हात लावल्यासारखी जाणीव होते.’ अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुरंदरे यांचे काwतुक केले होते.
शिवशाहीर पुरंदरे हेसुध्दा शिवसेनाप्रमुखांच्या कार्याची नेहमी प्रशंसा करायचे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिवसेनेचे कार्य सुरू आहे. शिवरायांनी रयतेच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लींग चेतवले तर बाळासाहेबांनी सर्वसामान्य मराठी माणसामध्ये स्वाभिमानाचा अंगार फुलवला, अन्यायाविरुध्द पेटून उठण्यासाठी त्यांच्या मनगटात ताकद दिली’ असे शिवशाहीर नेहमी सांगायचे.
‘बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला विचारांचे बाळकडू दिले. त्यांनी दिलेल्या माणुसकीच्या धडय़ांमुळेच सर्वसामान्यांचे प्रश्न धसास लावणारे शिवसैनिक घडले. या शिवसैनिकांमधूनच उत्तम राजकारणी निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य शिवसेनाप्रमुखांनी केले.’ असे प्रशंसोद्गार शिवशाहीर पुरंदरे यांनी काढले होते. ‘जाणता राजा’ या महानाटय़ासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख आणि शिवशाहीर अनेकदा एकत्र यायचे. त्याप्रसंगी मावळ्यांची पगडी घालून शिवशाहीरांकडून शिवसेनाप्रमुखांचा सन्मान केला जायचा.































































