
शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱया बुरुडगाव येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. महापालिकेच्या कचरा डेपोला एनओसी देताना ग्रामपंचायतीने पिण्याचे पाणी देण्याची अट घातली होती. तथापि महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी बुरुडगावला जाणूनबुजून पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे 25 मार्चपर्यंत बुरुडगावला पिण्याचे पाणी सुरू न केल्यास मनपाचा कचरा डेपो येथील प्लॅण्ट बुरुडगावचे नागरिक बंद करतील. कचऱयाच्या गाडय़ा डेपोवर येऊ देणार नाही, असा इशारा सरपंच अर्चना कुलट यांच्यासह गावकऱयांनी दिला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
बुरुडगावकर सात ते आठ वर्षे पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत. बुरुडगाव मनपामध्ये असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दिली होती. त्यावेळेसदेखील गावाला पाणी मिळत नव्हते. आजही बुरुडगावातील जनतेला पाण्यावाचून वंचित रहावे लागत आहे. मनपाचा टॅक्स वार्षिक 3000 रुपये आहे; परंतु गावातील जनतेला खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेताना वार्षिक सात ते आठ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.
ग्रामपंचायतने मनपाला एनओसी देताना पिण्याचे पाणी बुरुडगाव गावठाण व वाडीवस्तीसाठी मोफत देण्यात यावे, नगर ते बुरुडगाव कचरा डेपोपर्यंत घनकचऱयाच्या माध्यमातून डेपोसाठी पाईपलाईन टाकण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात यावी. महापालिकेने कचरा डेपोवर 2011 पासून मोठमोठे प्लॅण्ट उभे केले असून, ग्रामपंचायतने मागणी करूनदेखील कुठलाही टॅक्स दिलेला नाही. नगर ते बुरुडगाव हे अंतर फक्त तीन किलोमीटर आहे; परंतु मनपाचे अधिकारी, पदाधिकारी जाणूनबुजून बुरुडगावला पिण्याच्या पाण्यावाचून वंचित ठेवण्याचे काम करत आहेत. एनओसी देताना अधिकारी, पदाधिकारी, आयुक्त,महापौर सर्व उपस्थित होते. तरी पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर खंडू काळे, किशोर कर्डिले, शेख सिराज, रवींद्र ढमढेरे, दिनेश शेळके, जालिंदर वाघ, बापूसाहेब कुलट, नवनाथ वाघ यांच्या सह्या आहेत.
































































