
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आलोक वर्मा यांची सीबीआय संचालक प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आलोक वर्मा यांची हलाकपट्टी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सक्तीच्या रजेवरून आलोक वर्मा कालच हजर झाले होते आणि आज त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या निवड समितीमध्ये काँग्रेस नेते मलिकार्जुन खरगे आणि न्यायमूर्ती ए.के. सीकरी यांचा समावेश आहे. निवड समितीने 2 विरुद्ध 1 मताने आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी आणि सीकरी यांनी आलोक वर्मा यांना हटवण्याच्या बाजूने तर मल्लीकार्जुन खरगे यांनी विरोधात मत दिले.
याआधी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि त्यांचे सहकारी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादानंतर 23 ऑक्टोबर 2018 ला मोदी सरकारने वर्मा आणि अस्थाना या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यानंतर आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करतानाच हा निर्णय रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. वर्मा यांच्याकडे पुन्हा सीबीआय संचालकपदाचा कार्यभार देण्याचेही आदेश यावेळी न्यायालयाने दिले. त्यानंतर कार्यभार स्वीकारलेल्या वर्मा यांनी तडकाफडकी काही निर्णय घेतले आणि अखेर गुरुवारी निवड समितीच्या बैठकीनंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली.
भ्रष्टाचाराचे आरोप आणि ‘राफेल’ची चौकशी
– गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची एप्रिल 2016 मध्ये सीबीआयचे अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती केल्यापासूनच वाद सुरू आहे. अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जितले अधिकारी असल्याची चर्चा आहे.
– जानेवारी 2017 ला आलोक वर्मा यांची दोन वर्षांसाठी सीबीआय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अस्थाना यांना विशेष संचालक केले गेले. ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भुषण यांनी अस्थानांच्या नुयक्तीला आक्षेप घेऊन सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती; पण कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.
– सप्टेंबर 2018 मध्ये सीबीआयमध्ये भुकंप झाला. अस्थाना यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे सहा गुन्हे दाखल करून सीबीआयने चौकशी सुरू केली. मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्या विरुद्धचा तपास थांबविण्यासाठी अस्थाना यांनी कोटय़वधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
– भ्रष्टाचाराच्या गुह्यांनंतर अस्थाना यांनीही संचालक वर्मा यांच्यावर आरोप केले. हा वाद विकोपाला गेला. देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा वादात अडकली. वर्मा आणि अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. परंतु सुप्रीम कोर्टाने वर्मा यांची पुन्हा सीबीआय संचालकपदी नियुक्तीचे आदेश दिले होते.


























































