म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?

‘वंशाला दिवा हवा,’ यासाठी मुलांचा हट्ट धरण्याचं प्रमाण आता गेल्या काही वर्षांपासून कमी झालेलं दिसत आहे. मुलांप्रमाणे मुलीही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर दिसत आहेत. त्यामुळे दत्तक घेण्यात मुलांच्या तुलनेत मुलींना जास्त पसंती मिळत आहे, अशी माहिती नुकतीच एका आकडेवारीवरून समोर आली आहे. केंद्रीय महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ‘सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटी’ ही देश पातळीवर दत्तकची नोंदणी करणारी यंत्रणा कार्यरत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दत्तक माहिती 11 राज्यांनी सादर केली असून यातून ही माहिती समोर आली आहे. 2021 ते 23 या काळात देशभरात 15,486 दत्तक प्रक्रिया पार पडल्या. त्यामध्ये 9474 मुलींना तर 6012 मुलांना दत्तक घेण्यात आले.

दोन वर्षांपेक्षा लहान मुलींना पसंती

n इच्छुक दाम्पत्यांनी दोन वर्षांपेक्षा लहान अपत्ये दत्तक घेण्यास प्राधान्य दिल्याचे आढळून आले आहे. त्यांचे प्रमाण सुमारे 70 टक्के आहे. दहा टक्के दाम्पत्यांनी दोन ते चार वर्षे, आणि 15 टक्के दाम्पत्यांनी चार ते आठ वर्षे वयाच्या अपत्यांना दत्तक घेण्यास प्राधान्य दिले.

n पंजाब आणि चंडीगडमध्ये मुली दत्तक घेण्याचे प्रमाण या काळात सर्वाधिक असल्याचे या अहवालातून आढळले आहे. पंजाबमध्ये 7496 अपत्ये दत्तक घेण्यात आली; त्यामध्ये 4966 मुली आणि 2530 मुलगे आहेत. चंडीगडमध्ये दत्तक घेतलेल्या 167 पैकी 114 मुली आहेत.

n हिमाचल प्रदेशात एकूण 2107 दत्तक अपत्यांमध्ये 1278 मुली आहेत. तामीळनाडूमध्ये 1671 पैकी 985 मुली आहेत, तर दिल्लीमध्ये 1056 मध्ये 558 मुली आहेत. उत्तराखंडमध्ये 685 पैकी 472 मुली आहेत. आंध्र प्रदेशात 1415 पैकी 835, ओडिशामध्ये 291 पैकी 165 मुली; तर पश्चिम बंगालमध्ये 228 पैकी 112 मुली आहेत. तेलंगणामध्ये मात्र दत्तक घेणाऱया दाम्पत्यांनी मुलग्यांना अधिक प्राधान्य दिले.

मुलींना प्राधान्य का?

दत्तक घेणाऱया दाम्पत्यांमध्ये मुलींना मिळणारे प्राधान्य दिवसेंदिवस वाढत आहे. मुली शांत स्वभावाच्या असतात, त्यांची वागणूक चांगली असते. त्यामुळे त्यांना हाताळणे, त्यांचे संगोपन तुलनेने अधिक सुलभ ठरते. दत्तक घेण्यामध्ये कुटुंबातील महिलेचा पुढाकार असतो, त्यांच्यासाठी मुलींशी जुळवून घेणे अधिक सहज सोपी ठरते. मुली संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवतात, कुटुंबातील सगळ्याच सदस्यांना लळा लावतात. संपत्तीमध्ये वाटा मागण्यात मुली मागे आहेत.

काही भागात मुलगी ‘नकुशी’

‘वंशाला दिवा हवा,’ ‘संपत्तीला वारस मुलगा हवा,’ येथपासून ते ‘अंत्यसंस्कार मुलगा करतो,’ अशा विचारांचा अनेक लोकांवर पगडा आहे. त्यामुळे अजूनही अनेक भागात मुलगी ‘नकुशी’ ठरते. काही भागांमध्ये तर कडक कायदे करूनही गर्भलिंग निदान सर्रास सुरू असते.