दादागिरी कंट्रोल करणार आहात का? छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने भाषण करताना शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आज सरकारलाच घरचा आहेर दिला. मनोज जरांगे हे याला टपकवीन, त्याला टपकवीन अशा धमक्या देत आहेत, राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. मनोज जरागेंची दादागिरी ‘पंट्रोल’ करणार आहात का, असा जाब भुजबळ यांनी केला.

मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या विधेयकाला माझा विरोध नाही, पण ज्या मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांनी भाषणात उल्लेख केला ते जरांगे सतत धमक्या देत आहेत. याला टपकवीन, त्याला टपकवीन असे सांगत आहेत. मलाही त्यांनी धमक्या दिल्या आहेत. हे काय सुरू आहे, असा सवाल सरकारला करून भुजबळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाखाली बसून मनोज जरांगे हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या देत आहेत. महसूल आयुक्त व जिल्हाधिकाऱयांनाही शिव्या देत आहेत. ही दादागिरी सुरू आहे. ही दादागिरी पंट्रोल करणार का नाही, असा सवाल छगन भुजबळ यांनी सरकारला केला.

अध्यक्षांचे सरकारला आदेश
छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या धमकीच्या मुद्दय़ावर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले की, छगन भुजबळ यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. सभागृहाने याची नोंद घेतली आहे. सरकारनेही याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले.