
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाइन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर सध्या फिजिओथेरपी सुरू असून त्यांना योग्य वेळी डिस्चार्ज देण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या त्रासामुळे 10 नोव्हेंबर रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपल्या प्रकृतीविषयीची माहिती राज्यातील जनतेला दिली होती. जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्याने लवकर तब्येत बरी होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर यशस्वी स्पाइन सर्जरी करण्यात आली. एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांच्या निरीक्षणाखाली ते उपचार घेत आहेत.
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे रविवारी मुंबई दौऱयावर होते. त्यावेळी त्यांनी आवर्जून सौ. रश्मी ठाकरे यांना दूरध्वनी केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आज रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून योग्य वेळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

































































