नालेसफाईसाठी बालमजुरांना जुंपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनीधी । डोंबिवली

सरकारने बंदी घालूनही डोंबिवलीत ठेकेदाराने नालेसफाईसाठी बालकामगारांना जुंपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील गोग्रासवाडी परिसरात अनेक लहान मुले नाले, गटारे साफ करत असल्याचे दिसत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ठेकेदारांची बालकामगार ठेवण्यापर्यंत मजल पोहचली असल्याचा आरोप होत आहे.

पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे संपलेली नाहीत. उलट लवकरात लवकर कामे संपण्याची घाई सुरू असून त्यासाठी मिळतील मजूर ठेकेदारांकडून राबवले जात आहेत. यामध्ये बालकामगारांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र बालकामगार प्रतिबंधनुसार वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास कायद्याने गुन्हा आहे.  विशेषत: १४ वर्षांखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास मनाई आहे. तरीही डोंबिवली पूर्व येथील गोग्रासवाडी येथे बालकामगारांकडून नालेसफाई करवून घेतली जात असल्याचे दिसून आले. हे बालमजूर कसारा येथून आले असून यासंदर्भात संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

ठेकेदारावर कारवाई होणार

नालेसफाईचे काम देताना बालमजुरांकडून काम करून घेण्यास बंदी असल्याचे नमूद केले जाते. पण तरीही असा प्रकार होत असेल तर  संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे महापौर विनिता राणे यांनी स्पष्ट केले.