मालकाने सोडून दिलं, सरकारने लिलाव केला! 18 लाखांना विकला गेला कुत्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाळीव प्राण्यांना बेवारस पद्धतीने सोडून देणाऱ्या महाभागांची या जगात कमी नाही. त्याचा काय परिणाम त्या प्राण्यावर होईल, याचा अजिबात विचार ते करत नाहीत. असे प्राणी ठेवून घेण्यासाठी सहजासहजी लोक राजी होत नाहीत. पण, एका कुत्र्याचं नशीब मात्र चांगलंच फळफळलं आहे.

चीनमध्ये हा कुत्रा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी या कुत्र्याचा मालक त्याला एका पेट सेंटरमध्ये सोडून निघून गेला होता. या कुत्र्याचं नाव डेंग-डेंग असं असून तो शिबू इनू नावाच्या प्रजातीचा कुत्रा आहे. त्याच्या आधीच्या मालकाने त्याला मॅराथन नावाच्या पेट सेंटरला सात वर्षांपूर्वी सोडलं होतं.

त्याने पेट सेंटरची फी देखील दिली नव्हती. त्यानंतर या कुत्र्याची कहाणी चीनमध्ये व्हायरल झाली. अखेर त्या संस्थेने कोर्टात धाव घेत कुत्र्याच्या लिलावासाठी परवानगी मागितली. कोर्टानेही ती परवानगी दिली. त्यानंतर या कुत्र्याचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात आला.

या लिलावाला 480 लोक आले होते. लिलावात या कुत्र्यावर घसघशीत बोली लावण्यात आली. त्यानंतर त्याला 1 लाख 60 हजार युआर म्हणजे तब्बल 18 लाख रुपये इतकी किंमत मिळाली. सध्या हा कुत्रा चीनमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.