
सामना प्रतिनिधी । पुणे
प्रेमास नकार दिल्याने रागाने बेभान झालेल्या उद्योगपतीने भर रस्त्यात प्रेयसीची गाडी अडवून सपासप चॉपरने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा उद्योगपती पळून जाऊन कोल्हेवाडीच्या डोंगरामध्ये जाऊन लपून बसला. तेथून त्याला शोधून काढून सिंहगड रस्ता पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लक्ष्मण तुकाराम धावडे (46, किरकटवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पीडित महिलेने यासंदर्भात सिंहगड रस्ता पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीचे धायरी येथे ब्युटी पार्लर आहे. गेल्या आठ वर्षापासून तिने आणि धावडेचे प्रेमसंबंध होते. धावडे हा विवाहित असून, त्याला एक मुलगा आहे. विविध मशिनचे सुटे भाग तयार करण्याची त्याची कंपनी आहे. धावडेचा त्रास वाढत असल्याने या तरूणीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यातून त्याने सुमारे दीड वर्षापूर्वी या तरूणीला मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल आहे. ही तरूणी त्याच्या प्रेमाला नकार देत असल्याने त्याचा तिच्यावर राग होता.
मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही तरूणी तिच्या ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या मुलीला घरी सोडण्यासाठी गेली होती. नांदेड फाटा दळवी वाडी येथून ती दुचाकीवरून परत जात असताना धावडेने त्याची चारचाकी तिच्या दुचाकीसमोर आडवी लावून रोखले. तरूणीने धावडेला जाब विचारला असता, दोघांमध्ये वाद झाले. त्याने त्याच्या गाडीच्या मागच्या सिटवर ठेवलेल्या चॉपरने तिच्या मानावरे, डोक्यात, दोन्ही हातावर, पाठीवर सपासप वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना भर रस्त्यात होत असताना तिने आरडओरडा करून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर गर्दी वाढत असल्याने धावडेने तेथून पळ काढला. याची माहिती सिंहगड रस्ता पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरूणीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धावडे हा कोल्हेवाडी येथील डोंगरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने डोंगरामध्ये जाऊन त्याचा शोध घेऊन धावडेला अटक केली.
वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील म्हणाले, या दोघांची आठ वर्षांपासून ओळख होती. या तरूणीवर वार केल्यानंतर धावडे हा कोल्हेवाडी येथील डोंगरात लपून बसल्याची माहिती बातमीदाराने दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.































































