
कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळय़ांची एकजूट गरजेची आहे. आरोग्यसेवक, परिचारिका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणांतील कोविड योद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढीपाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबूया. नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजूला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करूया.

































































