
जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदयनगर येथील म्हाडा हाऊसिंग वसाहतीतील सभागृहाचे काम शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर मार्गी लागले आहे. सभागृहाच्या शेड बांधणीच्या कामाला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली असून बांधकामासाठी आवश्यक निधी प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वी सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.
शिवसेना आमदार बाळा नर यांनी सभागृहाच्या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले. त्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सर्वोदयनगरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाआधी सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती. रहिवाशांच्या मागणीला अनुसरून शिवसेना आमदार बाळा नर यांनी म्हाडा आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर वारंवार पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या पत्रव्यवहाराची गंभीर दखल घेत अखेर म्हाडाकडून शेड बांधणीच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे.
तसेच सभागृह बांधकामासाठी आवश्यक निधी प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून देण्याबरोबरच कार्यादेश देण्यात आला आहे. त्यानुसार तातडीने सभागृहाचे बांधकाम सुरू करून ते गणेशोत्सव सुरू होण्याआधीच पूर्ण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी शिवसेनेच्या पाठपुराव्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.



























































