कोरोनाच्या ‘हवाई हल्ल्या’ने विक्रमी रुग्णवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आटोक्यात आलेल्या कोरोनाने फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. कोरोनाच्या या दुसऱया लाटेत दररोज रुग्णवाढीचे विक्रम होत आहेत. याला महत्त्वाचे कारण म्हणजे ‘बदललेला’ कोरोना! या ‘डबल म्युटन स्ट्रेन’मध्ये सुरुवातीचे 5 ते 7 दिवस बाधितामध्ये कोरोनाची लक्षणेच दिसत नाहीत. शिवाय केवळ ’निकट’ संपर्कातून प्रसरणारा कोरोना आता हवेतूनही वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या या ‘हवाई हल्ल्या’मुळे दररोज विक्रमी रुग्णवाढ होत आहे. राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी ‘सामना’शी बोलताना ही माहिती दिली.

कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्याचे कारण कोणते?

पालिका, राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र वर्षभरात कोरोनाचा स्ट्रेन कमालीचा बदलला आहे. रुग्णांमध्ये पहिल्या आठवडय़ात लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे बाधित असूनही गर्दीत राहिल्याने लागण वाढत आहे. संपूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

कोरोनाची लागण होण्याची कारणे बदलली आहेत का?

नक्कीच! सुरुवातीला केवळ खोकला, शिंका, थुंकी, निकट संपर्क, रुग्णाच्या संपर्कातील वस्तूवर विषाणू राहिल्याने लागण होत होती. पण आता सुरुवातीच्या कारणांसोबतच हवेतून प्रसार होऊ लागल्याने एकाच वेळी अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. लोक वेदनाशामक गोळ्या घेतात, चाचण्या करण्याकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये आजाराची तीव्रताही वाढते. शिवाय अनेकांना लागणही होते.

कोविडच्या या नव्या प्रकारात धोका वाढला आहे का?

नाही. कोरोनाच्या या ‘म्युटन स्ट्रेन’मध्ये प्रसार वेगाने होत आहे. मात्र मृत्युदर कमालीचा घटला आहे. आधी  एकूण बाधितांमधील 50 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नसायची. तर 35 टक्क्यांमध्ये सौम्य लक्षणे तर 10 टक्के मध्यम आणि 5 टक्के तीव्र लक्षणे होती. मात्र सद्यस्थितीत 85 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. 15 टक्क्यांमध्ये सौम्य मध्यम लक्षणे दिसत असून यातील केवळ 3 ते 4 टक्के रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसू लागली आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना लवकर लागण होते.

वेगाने रुग्णवाढ होत असताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

 सुरुवातीला केवळ सर्दी, ताप, श्वसनास त्रास अशी प्रमुख लक्षणे होती. पण आता पोटाचे आजार, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे वाढली आहेत. ज्येष्ठ आणि सहव्याधी असणाऱयांना लागण लवकर होत होती, पण आता तरुणांमध्येही लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना लक्षणे नसल्याने प्रसार वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास पालिका किंवा खासगी प्रयोगशाळेत चाचणी करून घ्यावी.  लक्षणे नसल्याने घरी क्वारंटाइन राहणाऱया पॉझिटिव्ह रुग्णांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तब्येत ठीक असली तरी संपूर्ण 14 दिवस क्वारंटाइन पाळले पाहिजे.

विषाणू संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी असणारे ’रेमडेसिवीर’ची कमतरता आहे?

 रेमडेसिवीर कोरोनावर प्रभावी असले तरी प्रत्येक रुग्णासाठी याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. कारण याचा उपयोग केवळ रुग्ण लवकर बरे होण्यासाठी होतो. त्यामुळे रेमडेसिवीरसाठी रुग्ण आणि नातेवाईकांनी हे इंजेक्शन मिळवण्यासाठी नाहक धडपड करू नये. मुंबईत आवश्यक इंजेक्शन पालिका उपलब्ध करीत आहे. दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे, बेड वाढवले जात आहेत. असे असले तरी मुंबईकरांनी कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर  आणि पात्र लाभार्थ्यांनी लस घेऊन नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे.

 मुलाखत : देवेंद्र भगत