
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली असली तरी अजूनही दररोज 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, नाटय़गृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारीअखेरची कोरोना स्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तोपर्यंत लसीकरणही पूर्ण झालेले असेल. यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली तर टास्क फोर्सला अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत डिसेंबरअखेरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. यामध्ये रुग्णवाढीचे प्रमाण इतके जास्त होते की, डिसेंबरच्या सुरुवातीला 200 ते 250 पर्यंत नोंदवली जाणारी दैनंदिन रुग्णसंख्या थेट 20 हजारांवर पोहोचली. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारला पुन्हा एकदा निर्बंध कठोर करावे लागले. मात्र सर्वाधिक रुग्णवाढीची तिसरी लाट महिनाभरातच आटोक्यात आल्याने पालिकेने रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी उठवली आहे. शिवाय चौपाटय़ा, मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. मात्र थिएटर, हॉटेल-रेस्टॉरंट सध्या 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत.
आठवडाभरात मुंबईत 100 टक्के लसीकरण
मुंबईत गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला असून दुसरा डोस 96 टक्के पूर्ण झाला आहे. यामध्ये 18 वर्षांपुढील वयोगटातील सर्व सुमारे 92 लाख लाभार्थ्यांचे लसीकरण आठवडाभरात पूर्ण होईल.
15 ते 18 वर्षे वयोगटातील 9 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 3 लाख जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर मार्चपासून केंद्र सरकार आणि आयसीएमआरने परवानगी दिल्यास 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
या ठिकाणी अजूनही निर्बंध
हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाटय़गृहे, थीम पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, भजने आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये 50 टक्के उपस्थितीलाच परवानगी आहे. तर लग्नसमारंभासाठी 200 जण उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईचा डॅशबोर्ड
- सध्याचे सक्रिय रुग्ण 5743
- लक्षणे नसलेले रुग्ण 4714
- लक्षणे असलेले रुग्ण 681
- अत्यवस्थांची संख्या 348
- रुग्ण दुपटीचा कालावधी 760 दिवस
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के
मुंबईत दिवसभरात 356 बाधित
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत असून गेल्या 24 तासांत 356 कोरोनाबाधित आढळले आहेत. 29 हजार 863 चाचण्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहे. दरम्यान, गेल्या एकाच दिवसात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी 40 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 10 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. एकाच दिवसात 949 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आता 5139 सक्रिय रुग्ण राहिले आहेत.

































































