मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकावरील गुन्हेगारीला आता चाप बसणार; नव्या रेल्वे पोलीस ठाण्याचे उ‌द्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या लोकसंख्येमुळे मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांवर वाढणाऱ्या गुन्हेगारीला आता तत्काळ चाप बसणार आहे. भाईंदर रेल्वे स्थानकावर एका नव्या रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले असून प्रवाशांना तक्रारीसाठी घालावा लागणारा वसईचा वळसाही वाचणार आहे. दोन पोलीस अधिकारी आणि ४७ पोलीस कर्मचारी गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी या रेल्वे स्थानकावर ऑन ड्युटी २४ तास असणार आहेत.

मीरा रोड आणि भाईंदर या रेल्वे स्थानकांवर मोबाईल व बॅग चोरी, छेडछाड, हाणामाऱ्या तसेच महिलांवरील लैंगिक अत्याचार व छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी भाईंदर येथे स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन रेल्वेचे महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या हस्ते करण्यात आली.

वेळ आणि खर्च वाचणार
यापूवीं या रेल्वे स्थानकातील प्रवाशांना कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात जावे लागत होते. वसईचे अंतर अधिक असल्याने नागरिकांचा वेळ वाया जात होता, खर्चही वाढत होता. त्यातच वसई रेल्वे पोलीस ठाण्यावर कामाचा मोठा ताण असल्याने गुन्ह्यांचा तपासात विलंब होत होता. त्यामुळे अनेक प्रवासी तक्रार नोंदवणे टाळत होते.

दहिसर, मीरा रोड, भाईंदर आणि नायगाव
नवीन भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दहिसर, मीरा रोड, भाईंदर आणि नायगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या पोलीस ठाण्यासाठी सध्या २ पोलीस अधिकारी आणि ४७ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जीआरपी आणि सीआरपीएफ पथकांची मदत घेण्यात येणार आहे.