
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या उन्हवरे येथील गरम पाणी कुंडाला पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या उन्हवरे नदीचे पाणी थेट गरम पाणी कुंड परिसरात शिरल्याने हे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले पर्यटनस्थळ धोक्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे परिसरात गाळ साचला असून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी चिंता व्यक्त केली.
उन्हवरे गरम पाणी कुंड हे कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून वर्षभर पर्यटक येथे भेट देतात. नैसर्गिक गरम पाण्याचे झरे, धार्मिक श्रद्धा आणि निसर्गरम्य परिसरामुळे या ठिकाणाला विशेष ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुसळधार पावसाच्या काळात नदीला पूर आल्यावर कुंड परिसरात पाणी शिरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
गाळ साचल्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे नदीला पूर आल्यावर पाणी थेट कुंड परिसराकडे वळते. हे टाळण्यासाठी उन्हवरे नदीचे गाळमुक्तीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.































































