
केंद्रातील सरकारने आणलेल्या ई-30 इंधनाला देशभरातून विरोध होत असतानाच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक वेगळाच दावा केला आहे. येत्या काळात राजधानी दिल्लीतील बस पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिकवर नव्हे, तर शहरातील कचऱ्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनवर सुसाट धावतील, असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.
जर महापालिकेचा कचरा योग्य पद्धतीने वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली, तर त्यापासून हायड्रोजन तयार करता येईल आणि त्याच इंधनावर बस चालवता येतील. ही केवळ कल्पना नसून हे पूर्णपणे शक्य आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. महापालिकेचा कचरा प्रथम वेगवेगळा केला जाईल. त्यानंतर बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यापासून हायड्रोजन वायू तयार केला जाईल. भविष्यात दिल्लीतील बस याच हायड्रोजनवर धावतील. दिल्लीतील लँडफिल साईटस्वरील 80 लाख टन कचऱ्याचा वापर आधीच एक्स्प्रेसवे उभारण्यासाठी करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.






























































