
सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असतानाच तळोजातील सेक्टर 10 येथे आज भीषण अपघात झाला. कारचालकाने आठ ते दहा जणांना जोरदार धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून कारचालक फरार झाला आहे. रिक्षासह पाच गाडय़ांनाही ठोकर दिली असून रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तळोजातील या हिट अॅण्ड रनमुळे नागरिकांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तळोजातील सेक्टर 10 येथील रस्ता हा नेहमी रहदारीचा असतो. आज सकाळी एका कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बेफामपणे आठ ते दहा जणांना उडवले. या भीषण दुर्घटनेमध्ये नदीम खान (35) यांच्यासह दोघांचा जीव गेला. कारचालकाने बेदरकारपणे एका रिक्षालाही धडक दिली. त्यात रिक्षाचे अतोनात नुकसान झाले असून कारचा पुढील भागही दबला आहे. या अपघातात ठार झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.
अपघात झाल्यानंतर कारचालक गाडी सोडून घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. फरार कारचालकाचा शोध सध्या सुरू असून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या हिट अॅण्ड रनमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
फरार कारचालकाचा शोध सध्या सुरू असून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
शिवसैनिक मदतीला धावले
तळोजातील हिट अॅण्ड रन माहिती समजताच शिवसेनेचे उपनेते बबन पाटील, कैलास पाटील यांच्यासह शिवसैनिक व स्थानिकांनी धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून घटनास्थळावरून पसार झालेल्या कारचालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.



























































