
पहिल्याच पावसात मुंबईचे हाल झाले. कुणी स्लॅब कोसळून मरतेय तर कुणी मॅनहोलमध्ये पडून, चाटम फक्त निर्लज्जपणे हसताहेत. भाजपला ना शहराचे प्रशासन चालवता येत, ना देशाचे ना मंदिरांचे, सर्वत्र केवळ लूट आणि भ्रष्टाचार सुरू आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज चढवला.
आदित्य ठाकरे यांनी विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पावसामुळे झालेल्या मुंबईच्या दैनेवरून त्यांनी सत्ताधारी भाजपचा खसपूस समाचार घेतला. पहिल्या पावसात मुंबईचे हाल झाले त्यावरून भाजपने महापालिका प्रशासनालाच दोषी ठरवले आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, भाजपला नेहरू, ठाकरे यांच्यानंतर आता पालिका प्रशासन हे नवे टार्गेट मिळाले आहे, अशी टीका केली.
राज्यात चार दिवस दुर्घटना घडत आहेत, पण नगरविकास मंत्री कुठेच नाहीत, पैसे खात राहायचे, पण जनतेला उत्तरे द्यायची नाहीत हेच चालले आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
राम मंदिर लूटप्रकरणी अनिल मिश्रा आणि चंपत राय यांचे राजीनामे घेतले गेले म्हणजे तिथे भ्रष्टाचार झालाय हे स्पष्ट होते. देशातील हिंदूंनी प्रश्न विचारले तेव्हा राजीनामा द्यावा लागला, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आज देशातील लाखो-कोटय़वधी हिंदू जागृत झाले आहेत आणि ते विचारत आहेत की, ज्या राम मंदिरासाठी तुम्ही आम्हाला आंदोलन करायला लावलं, मोर्चे काढायला लावले, रथयात्रा काढल्या, निवडणुका जिंकल्या आणि आमची मते घेतली, त्याच राम मंदिरात तुम्ही निर्लज्जपणे घोटाळा कसा काय करू शकता? पण या प्रश्नांची उत्तरे द्यायला भाजपचा एकही नेता पुढे येत नाही. हिंदुत्वासाठी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांमध्ये तरी भाजपला प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का, मिंधेंमध्ये आहे का हिंमत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
12 वर्षे भाजपचेच लोकप्रतिनिधी, तरीही अंधेरी सब वे तुंबला
भाजपची सत्ता आल्यापासून अनेक महापालिकांमध्ये शहरांचे हाल झाले आहेत. कुठेच पावसाळापूर्व नियोजन नाही. अंधेरी सब वेत पाणी तुंबल्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार अमित साटम यांच्यावरही निशाणा साधला. 12 वर्षे भाजपचेच खासदार, आमदार, नगरसेवक आहेत तरीही रिमझिम पावसातही अंधेरी सब वे तुंबतो, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना महापालिकेमध्ये सत्तेत होती तेव्हा गांधी मार्पेट, मिलन सब वे, हिंदमाता पूरमुक्त करून दाखवले होते. ते चाटम सगळीकडे शिवीगाळ करतात, वाटेल ते बोलतात. महापौरदेखील कामापेक्षा बांगलादेशींवर लक्ष ठेवून आहेत, असे टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडले.
मिसिंग लिंकवर भ्रष्टाचाराची दरड कोसळली
मिसिंग लिंक चार वर्षे उशिराने तयार झाला. हजारो कोटींनी खर्च वाढलाय. हे सगळं झाल्यावर इन्फ्रा मॅन मीच आहे दाखवायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद सुरू असतो. मिसिंग लिंकचा रस्ता सपाट नाही, काल तर त्यावर दरड कोसळली, कमानीचा स्लॅबही कोसळला, किती भ्रष्टाचार सुरू आहे तो बघा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.






























































