शाळा-काॅलेजांच्या आवारात खासगी क्लासेसना बंदी! सरकार लवकरच कठोर कायदा आणणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काॅलेजसोबत साटेलोटे करून विद्यार्थी-पालकांची लूट करणाऱ्या खासगी क्लासेसच्या मनमानीला आळा घालण्यासाठी कठोर कायदा आणण्यात येईल. यामध्ये काॅलेजच्या आवारात खासगी क्लासेसना बंदी घातली जाऊ शकते, असे संकेत आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.

आमदार कृपाल तृमाने व डॉ. मनीषा कायंदे यांनी राज्यात खासगी टय़ुशन क्लासेस व कोचिंगकडून दिशाभूल करण्याच्या जाहिराती, खोटय़ा यशोगाथा व निकालांचा गैरवापर करून विद्यार्थी व पालकांची लूट करण्यात येत असल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. अशा खासगी क्लासेसवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले, राज्यातील खासगी शिकवणी व्यवसायासाठी स्पष्ट नियमावली तयार करून विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नवा कायदा आणला जाणार आहे. विधेयकाचा मसुदा अंतिम टप्प्यात असून कायदा व न्याय विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर तो सूचना व हरकतींसाठी सार्वजनिक केला जाईल. त्यानंतर येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येईल.

असा होणार कायदा

केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये खासगी कोचिंग क्लासेससंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार काही राज्यांनी कायदे केले आहेत. त्याच धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र खासगी कोचिंग क्लासेस (नोंदणी व नियमन) अधिनियम, 2026 चा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे सर्व महत्त्वाचे मुद्दे कायद्यात समाविष्ट केले जाणार आहेत. त्यात क्लासेससाठी आवश्यक निकष, नियम व नियंत्रणाची स्पष्ट तरतूद राहणार आहे.