मिठी नदी कधी होणार प्रदूषणमुक्त? प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ, खर्चात 21 कोटींची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मलनिःसारण प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत ‘मिठी पॅकेज 4’ बोगदा प्रकल्पाचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 21.03 कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराचा दर 12 टक्के वरून 18 टक्के केल्याचे कारण पुढे करत हा वाढीव भार पालिकेच्या तिजोरीवर पडला असून प्रकल्पाचा एकूण खर्च आता 625.34 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सुधारित खर्चाला मंजुरी मिळवण्यासाठीचा प्रस्ताव उद्या, बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीसमोर येणार आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये जेव्हा मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स आणि मे. मिशिगन इंजिनीअर्स (जॉइंट व्हेंचर) यांना 604.30 कोटींचे कंत्राट देण्यात आले, तेव्हा पावसाळ्यासह चार वर्षांत (म्हणजेच 2025 पर्यंत) हे काम पूर्ण करणे बंधनकारक होते, मात्र पालिकेच्या नेहमीच्या संथ कारभारामुळे आधीच या प्रकल्पाला 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ द्यावी लागली होती. आता जुलै 2026 उजाडला तरी 96.67 टक्के काम झाल्याचा दावा केला जात असून उर्वरित कामासाठी पुन्हा एकदा नवीन मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येतंय.

दूषित पाणी रस्त्यावर, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

बापट नाला आणि सफेद पूल नाला या भागातील सांडपाणी मिठी नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाणी रस्त्यावर पसरते. 2051 पर्यंतचा भविष्यातील 168 दशलक्ष लिटर (द.ल.लि.) प्रवाहाचा विचार करून हे पाणी धारावी प्रक्रिया केंद्राकडे वळवण्याचे नियोजन होते, पण हा प्रकल्प अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही.