
परिवहन विभाग (आरटीओ) भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनला आहे. तिथे लाचखोर अधिकाऱ्यांचे मोठे रॅकेट कार्यरत असून ते सहकार्य न करणाऱ्या इतर प्रामाणिक अधिकाऱयांनाच लाचलुचपत विभागाकडून ट्रप लावतात, असा आरोप करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भरविधानसभेत या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. इतकेच नव्हे तर आपल्या आरोपांना सबळ पुरावा म्हणून त्यांनी या अधिकाऱ्यांच्या कारनाम्याच्या ऑडिओ क्लिपही विधानसभा अध्यक्षांसमोर ठेवल्या. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत आरटीओ विभागातील भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली, करचुकवेगिरी आणि नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता या मुद्दय़ांवर चर्चा झाली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा मांडला. नागपूर आरटीओमध्ये चोरीच्या वाहनांच्या नोंदणीसह मोठ्या गैरव्यवहारांचा आरोप केला. तेथील संघटित वसुली रॅकेटची कार्यपद्धती सभागृहासमोर मांडली.
आरटीओत सक्रिय या रॅकेटमधील अधिकारी 15 वर्षांहून अधिक काळ विदर्भातच ठाण मांडून आहेत असे सांगत वडेट्टीवार यांनी त्या अधिकाऱयांची नावेही सांगितली. बजरंग खरमाटे (निवृत्त आरटीओ अधिकारी), रवींद्र भुयार (प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला), राजू नागरे (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, अमरावती), आनंद मोहोड (मोटार वाहन निरीक्षक, गोंदिया), योगेश खेसनार (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, खामगाव) हे अधिकारी मिळून बेकायदेशीर वसुली करतात. इतकेच नव्हे तर वसुलीला नकार देणाऱया अधिकाऱ्यांना टार्गेट करतात. ट्रान्सपोर्टरमार्फत तक्रारदार उभे केले जातात. एसीबी ट्रपसाठी नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती निर्माण केली जाते, अशी भयंकर वस्तुस्थिती वडेट्टीवार यांनी सभागृहासमोर आणली.
प्रियांका ननावरे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर उत्तर देताना सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आयपीएस अधिकारी प्रियांका ननावरे यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. या एसआयटीमध्य तीन सदस्यांचा समावेश आहे. ही एसआयटी एक महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल सादर करेल. वडेट्टीवार यांनी उल्लेख केलेल्या अधिकाऱयांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.




























































